लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेची गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू असून दोन दिवसांपासून येऊर मधील काही बंगल्यांवर देखील कारवाई सुरू केली आहे. मात्र महापालिकेच्या या कारवाईवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक ट्विट केले आहे.
येऊर येथील बगल्यांवर सहाय्यक आयुक्तांनी कारवाई सुरू केल्याने आपल्याला आश्चर्य वाटत असून आणखी पाच बंगल्यांवर तसेच जिथे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लाखो रुपये घेतले त्या कोठारी कंपाउंडवर कारवाई केली असती तर मला अभिमान वाटला असता असं खळबळजनक ट्विट आव्हाडांनी केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटमुळे पालिका वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.
दरम्यान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विट नंतर वर्तक नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. तर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त अश्विनी वाघमळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येऊर मधील बगल्यांवर गेल्या दोन दिवसांपासून कारवाई सुरू असून संबंधित सहाय्यक आयुक्तांकडून माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.