मुंबई - पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या कार्यकर्त्यांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन, आता राजकीय वर्तुळात चर्चां होत असून नेतेमंडळी आपली प्रतिक्रिया देत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी यावर आपले मत मांडलं. आता, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही शाईफेकीच्या घटनेनंतर दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भाच सरकारने मोठं मन दाखवलं पाहिजे होतं, असं म्हटलं आहे.
शाईफेक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, पण महाराष्ट्रातील महापुरूषांचे व स्त्रियांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे राज्यपाल, भाजपचे नेत्यांवर महापुरूषांचा अपमान केला म्हणून का गुन्हा दाखल केला जात नाही, असा प्रश्न अजित पवारांनी विचारला आहे. तर, ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करणे चुकीचंच आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. आता, जितेंद्र आव्हाड यांनीही या गुन्ह्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, माझ्यावरील ३५४ आणि ३०७ हे दोन्ही कलमं एकच आहेत, असेही त्यांनी म्हटलंय.
चंद्रकांत पाटील ह्यांच्या चुकीच्या विधानानंतर त्यांच्यावर चिडून केलेली शाईफेक चुकीचीच होती. पण, सरकार म्हणून मोठं मन असावं लागतं. हा आंदोलनाचा एक भाग असतो आणि ते अनेकवेळा अनेक ठिकाणी हे अनुभवले गेले आहे. पण, सरकार म्हणून आपण जेंव्हा त्यांच्यावर कलम 307 (म्हणजे मुडदा पाडण्याचा प्रयत्न) हा गुन्हा लावता; तेव्हा तर ते आणखीनच चुकीच ठरतं, असे जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. तसेच, न केलेल्या गुन्ह्यासाठी एखादं कलम लावणं ह्यातून आपण आंदोलनाच्या समर्थकांना पूर्णपणे जागे करीत आहात. माझ्यावर लावलेलं कलम 354 आणि शाईफेक करणाऱ्यावर लावलेलं 307 हे दोन्ही एकच आहेत, असेही आव्हाड यांनी म्हटलं.
काय म्हणाले अजित पवार
‘‘कोणावरही शाई फेक करणे चुकीचे आहे. त्याचे मी समर्थन करीत नाही. मात्र, चळवळीतून घडलेल्या आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांना शाळा बांधण्यासाठी देगणी, वर्गणी, लोक सहभागातून महापुरूषांनी निधी गोळा केला, असे म्हणता आले असते. त्यांनी खांद्यावरील रूमाल काढून त्याची झोळी करीत भीक मागण्याची कृती करून दाखविली. अपमानजनक उद्गार काढले, हे चुकीचे आहे.’’