- सदानंद नाईक उल्हासनगर - माजी आमदार पप्पु कलानीसह समर्थकांनी ओमी कलानी यांची उल्हासनगर विधानसभेसाठी उमेदवारी घोषित केली. दरम्यान सोमवारी रात्री कलानी यांच्या गोवा ट्रीप ठिकाणी राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन, ओमी कलानी यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
उल्हासनगरवर गेली चार दशके राजकीय हुकमत चालविणारे माजी आमदार पप्पु कलानी आता मुलांसाठी पुढे सरसावले आहेत. कलानी राष्ट्रवादी शरद पवार यांचे कट्टर समर्थक असून त्यांच्या धर्मपत्नी ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष व आमदार पदी राहिल्या आहेत. तर आता सुनबाई पंचम कलानी ह्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहरजिल्हाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे युवानेते ओमी कलानी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले. दरम्यान पप्पु कलानीसह त्यांचे समर्थक गोवा येथे गेले असून त्यांनी नियुक्त केलेल्या कोअर कमिटीने एकमताने ओमी कलानी यांची उमेदवारी घोषित केली. महाविकास आघाडीचे जागा वाटप झाले नसताना, कलानी समर्थकांनी ओमी कलानी यांचे नाव घोषित केल्याने, याला शरद पवार यांची संमती आहे का? असा प्रश्न निर्माण झाला होता.
माजी आमदार पप्पु कलानी यांच्या गोवा ट्रिपच्या ठिकाणी सोमवारी रात्री राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावल्याने, ओमी कलानी यांच्या उमेदवारीला पक्षाचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत ज्योती कलानी यांचा अवघ्या २ हजार मतांनी भाजपच्या आयलानी यांच्याकडून पराभव झाला होता. त्यावेळी एकत्रित शिवसेना आयलानी यांच्या बाजूने होती. यावेळी शिवसेना ठाकरेसेना गट महाविकास आघाडी सोबत राहणार आहे. कलानी यांचे कट्टर समर्थक कमलेश निकम यांनी ओमी कलानी हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.