ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरुद्ध काँग्रेसचे प्रियांक मल्लिकार्जुन खर्गे यांनी आक्षेपार्य विधान केले. त्याविरोधात ठाणे शहर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर खर्गे यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करुन निषेध आंदोलन शुक्रवारी छेडले. यावेळी फलक व पोस्टर घेऊन काँग्रेस विरोधात विविध घोषणा देत कार्यकर्त्यांनी हा परिसर दणाणून सोडला.
येथील शासकीय विश्रामगृहासमोर या कार्यकर्त्यांनी आज एकत्र येत काँग्रेसचे खरगे यांच्या निषेधार्थ आंदोलन छेडले. ठाणे शहर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे व भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहुलभैया लोणीकर यांच्या आदेशानुसार आणि भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्रवीर सावरकर यांच्या विरुद्ध गरळ ओकणारे काँग्रेसचे मुजोर नेते प्रियंक मल्लिकार्जुन खर्गे यांचा पुतळा चिरफाड करुन चपला, जोडे मारून हे निषेध आंदोलन केला, असे दळवी यांनी लोकमतला सांगितले.
या निषेध आंदोलनात भाजपा ठाणे जिल्हा सरचिटणीस मनोहर सुखदरे, सचिन पाटील,महिला मोर्चा जिल्हाअध्यक्षा स्नेहा पाटील, नौपाडा महिला मोर्चा मंडल अध्यक्षा वृशाली वाघुले- भोसले, युवा मोर्चा सरचिटणीस प्रशांत कळंबटे, प्रसाद विश्वकर्मा, सतीश केळशीकर, महिला मोर्चाच्या रितू शेकॉ, घोडबंदर महिला मंडल अध्यक्षा अर्चना पाटील व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.