ठाणे : कोरोना रुग्णांसाठी महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु त्यासाठी नगरसेवकांच्या खिशाला कात्री लावली जाणार असल्याने भाजपने याला विरोध केला आहे. परंतु भाजपला आता महापौर नरेश म्हस्के यांनी थेट उत्तर दिले असून महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टीचे जे राजकारण केले जात आहे तसे राजकारण आपण कृपया ठाण्यात करु नये अशी विनंती केली आहे. शिवाय भाजपने ज्या बैठकीवर आक्षेप घेण्यात आला त्या बैठकीत यावर चर्चाच झाली नसल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले आहे. तसेच निधी देण्याबाबत सर्व नगरसेवकांनी अनुमती दिली आहे. त्यामुळे उगाच राजकारण करुन चांगल्या कामात खोडा न घालण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. कोरोना रुग्णालयासाठी नगरसेवक निधी वापरण्याऐवजी आपला दवाखानाचा निधी वापरावा असे मत भाजपच्या नगरसेवकांनी व्यक्त केले आहे. त्या अनुषगांने आता महापौरांनी त्यांना सुनावले आहे. आयुक्तांच्या कार्यालयात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये निधी वर्ग करण्याचा परस्पर निर्णय घेतला असल्याचे नमूद केले आहे. परंतु या बैठकीमध्ये नगरसेवक निधीबाबत कोणत्याही प्रकारे चर्चा अथवा निर्णय झाला नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे. त्यातही ही बैठक पालकमंत्र्यांनी शिष्टाचाराप्रमाणे बोलविलेली बैठक नव्हती, त्यामुळे या बैठकीस स्थानिक आमदार, कोकण पदवीधर आमदार, गटनेते यांना बोलवणे अपेक्षीत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या कोरोनाची युध्दजन्य परिस्थीती असल्यामुळे ठाणेकरांच्या हितासाठी घेतलेल्या बैठकीचे राजकीय अर्थ लावून त्याचे राजकारण करु नये असेही त्यांनी स्पष्ट केले. चार महिन्यापूर्वी सर्व नगरसेवकांना ६० लाख रु पयांचा विशेष निधी उपलब करु न देण्याकरिता मी स्वत: व आमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाशी संघर्ष केला त्यावेळी शिंदे यांनी मध्यस्थी करून सर्वपक्षीय प्रत्येक नगरसेवकांना तो विशेष निधी उपलब्ध करु न दिला. त्यावेळी तुमच्या गटनेत्यांनी हा निधी घेत असताना आमच्या नेत्यांशी बोला असे आम्हाला सांगितलेले नाही. त्यामुळे निधी घेताना आमदारांना सांगण्याची गरज वाटत नसेल तर ५ लाख रु पये निधी देताना मी नेत्यांशी व आमदारांशी चर्चा करणे संयुक्तीक वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनासाठी मुंबईतील नगरसेवकांनी पाच लाख रु पयांची तरतूद केली, आपण ही असे करू अशी चर्चा आपल्या पक्षातील नगसेवकांनी नगरसेवक ग्रुपवर सुरू केली, त्यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी महापौरांच्या मनात देखील हा विषय आहे असे सांगत याबाबत महापौरांशी चर्चा करु असे नमूद केले. मुंबई महापालिकेने नगरसेवकांना निधी वर्ग करण्याचे जे पत्र दिले त्याची प्रत पण आपल्याच नगरसेवकाने ग्रुप वर नगरसेवकांच्या माहिती साठी उपलब्ध करून दिली. तेव्हा आपल्याच पक्षातील नगरसेवकांनी होकार दिलेला आहे, त्यामुळे आता त्याला विरोध करणे अयोग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कोरोनाच्या महासंकटाचा विचार करु न सर्वपक्षीय नगरसेवकांनी नगरसेवक निधीबाबत बहुमताने घेतलेल्या निर्णयाचा आपण फेरविचार करु न राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून ठाणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून विचार करु न सहकार्य करावे.