लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत, संघर्ष करून भरघोस यश प्राप्त केलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करत असलेल्या भारतातील दिग्गज महिलांची यशोगाथा महाविद्यालयातील प्राध्यापक व समाजसेवक महेश कुलसंगे यांनी उलगडली.
सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील एनसीसी गर्ल्स, १ - महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी, मुंबई ‘बी’ ग्रुपतर्फे बुधवारी ‘लेजिंडरी वूमेन इन इंडिया’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान पार पडले.
यावेळी कुलसंगे यांनी, २० वर्षे तीनही सेनादलातील सैनिकांना प्रशिक्षण देणाऱ्या, नारी-शक्ती पुरस्कारप्राप्त भारतातील पहिल्या महिला कमांडो ट्रेनर डॉ. सीमा राव, तसेच वयाच्या आठव्या वर्षांपासूनच समाजसेवेची आवड जोपासतानाच वयाच्या १६ व्या वर्षी नराधमांनी केलेल्या अत्याचाराला बळी पडलेल्या आणि नंतर पीडित व अत्याचारित महिलांसाठी ‘प्रज्ज्वला’ नामक हक्काचा निवारा उभारणाऱ्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त थोर समाजसेविका सुनिथा क्रिष्णन आणि धावत्या ट्रेनमधून गुंडांनी ढकलून दिल्यामुळे एक पाय गमावूनही नंतर जिद्दीने माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या जगातील पहिल्या दिव्यांग (अपघातानंतर) महिला व यानंतर सर्वच खंडांमधील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करणाऱ्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रभावशाली महिला अरुणिमा सिन्हा या असामान्य कर्तृत्ववान महिलांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कमलेश प्रधान, प्राचार्य डॉ. हेमंत चित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ. राधिका मुखर्जी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात ८६ कॅडेट्स सहभागी झाले होते.
-----------------