धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - गेल्या अनेक वर्षां पासून दहिसर टोल नाका येथील टोलचा भुर्दंड आणि टोल नाका मुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीने त्रस्त मीरा भाईंदरच्या नागरिकांना कारचा टोल रद्द झाल्याने दिलासा मिळाला आहे . मध्यरात्री पासून हलक्या चारचाकी वाहनां कडून टोल घेणे बंद झाले आहे.
दहिसर येथील टोल नाका मुळे मीरा भाईंदरच्या नागरिकांना तसेच मुंबईतून मीरा भाईंदर मध्ये येणाऱ्या नागरिकांना टोलचा भुर्दंड पडत होता . शिवाय येथे मोठी वाहतूक कोंडी होऊन लोकांचा वेळ आणि इंधन वाया जात होते .
मीरा भाईंदरच्या नागरिकांना ह्या टोल मधून सुटका मिळावी म्हणून आमदार गीता जैन व आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यां पासून संबंधित मंत्री आणि शासना कडे पाठपुरावा केला होता. अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्या पासून बैठका व आंदोलनाचे इशारे देखील त्यांनी दिले होते . टोल हटवण्या बाबत विविध मुद्दे आणि पर्याय मांडले गेले असे त्यांच्या पदाधिकारी यांनी टोल बंद झाल्या नंतर सांगितले.
गेल्या अनेक वर्षां पासून येथील टोल नाका विरोधात विविध राजकीय पक्ष - संघटनांनी आंदोलने केली होती . नागरिक देखील टोल वसुली सह वाहतूक कोंडी आणि वेळ - इंधन वाया जात असल्याने संतप्त होते . निवडणुकीच्या तोंडावर का होईना पण आता चारचाकी वाहनांना टोल मधून वगळण्यात आल्याने सदर नाक्या वरून ये - जा करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे .
आमदार गीता जैन व समर्थकांनी टोल नाक्यावर जाऊन वाहन चालकांना लाडू वाटून , ढोल ताशे वाजवत आनंद व्यक्त केला . गेल्या अनेक वर्षां पासूनचा टोल आणि वाहतूक कोंडीचा जाच मधून मीरा भाईंदरच्या नागरिकांची सुटका झाल्या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले . ज्यांनी शहराचे वाटोळे केले, विकास कामे रोखली त्यांना आता नागरिकांचा टोल माफ झाल्याने मोठी पोटदुखी झाली आहे . त्यांची मळमळ दूर करण्यासाठी जमालगोटा उपलब्ध असल्याचा टोला आ. जैन यांनी लगावला .
शासनाला केवळ दहिसर टोल नाका वरील चारचाकी वाहनांना टोल माफ करता येत नाही , निर्णय घ्यायचा तर मुंबई प्रवेशद्वारावरील सर्वच टोल नाक्यां बद्दल घ्यावा लागतो व त्यानुसार शासनाने निर्णय घेऊन सर्वच नागरिकांना दिलासा दिला आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती शासनाने नागरिकांच्या कार आदींना ना टोल मधून मुक्ती देऊन ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले .
भाजपाचे एड रवी व्यास यांनी भाजपा कार्यकर्त्यांसह टोल नाक्यावर लाडू वाटून घोषणाबाजी केली. मनसेचे संदीप राणे सह मनसैनिकांनी टोलनाक्यावर घोषणा दिल्या. रात्री शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख राजू भोईर सह विक्रम प्रताप सिंह व शिवसैनिकांनी टोलनाक्यावर जल्लोष केला.