वासिंद : जेएसडब्ल्यू (जिंदाल) कंपनीमध्ये वासिंद परिसरातील ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार द्यावा, तसेच सारमाळ येथील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शिवसेनेचे वासिंद ग्रामीण विभागप्रमुख राजदीप जामदार यांनी ठाणे जिल्हाधिकारी व शहापूर तहसील विभागाकडे केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
तालुक्यात कंपनीचे जेटीएमएस तसेच जेएसडब्ल्यू स्टील व पेंट असे दोन प्लँट असून, त्यांचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. या कंपनीत स्थानिकांना प्राधान्य दिले जात नाही. राेजगारांत परप्रांतीयांना प्राधान्य दिले जात आहे. ८० टक्के स्थानिकांना काम देणे हे शासनाचे धोरण (जीआर) असताना कंपनी व्यवस्थापन या नियमांचे उल्लंघन करून मनमानी कारभार करत असल्याचे जामदार यांनी म्हटले आहे, तसेच सारमाळ येथील शेतकरी रवींद्र अधिकारी व सागर राणे यांची जमीन संपादन करून दुसरी पर्यायी जागा देण्याचे आश्वासन व कुटुंबातील एक-एक व्यक्ती कामावर घेण्याची हमी दिली असताना इतर पर्यायी जागेचा प्रश्न सोडविला नाही, तसेच कुणाला नाेकरीही दिली नाही. याप्रकरणी त्वरित लक्ष घालून व चौकशी करून या शेतकऱ्यांना न्याय द्यावा व स्थानिकांना रोजगाराची संधी द्यावी, अन्यथा शिवसेना वासिंद ग्रामीण विभागप्रमुख व सर्व शाखाप्रमुखांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.