- अजित मांडकेठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघात २३ लाख ७ हजार १८९ मतदार एवढे असून यामध्ये पुरुष १२ लाख ६० हजार ८१ स्त्री मतदारांची संख्या १० लाख ४७ हजार १०८ एवढी आहे. मागील वेळेच्या तुलनेत स्त्री मतदारांच्या संख्येत सुमारे ९ टक्के वाढ झाली असली तरी १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या १३ हजार ४७ एवढी असून २० ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या ही ३ लाख १५ हजार ९९२ एवढी आहे. ही वाढलेली तरुणांची मतेच या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्टÑवादीच्या उमेदवारांनी त्यांना आकर्षित करण्यासाठी आपला मोर्चा सोशल मिडियावरील प्रचाराकडे वळविला आहे.उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर ठाणे लोकसभा मतदार संघात आता शिवसेनेने विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यांचा सामना राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांच्याशी होणार आहे. त्यामुळे पूर्वीचा शिवसैनिक विरुद्ध विद्यमान शिवसैनिक अशीच ही लढत होणार असून तिला शिक्षित विरुद्ध अल्पशिक्षित असा रंग दिला जात आहे. मनसेने अपेक्षेप्रमाणे आपल्या इंजिनाला राष्टÑवादीचे घड्याळ बांधल्याने त्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. आपचे ठाणे मतदार संघातील कार्य फारसे उल्लेखनिय नसले तरी त्यांची निर्णायक मते कोणाच्या पारड्यात जाणार हे गुलदस्त्यात आहे. एकूणच ठाणे लोकसभा मतदार संघात कांटे की टक्कर होणार हे मात्र नक्की.ठाणे लोकसभा मतदार संघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु, गणेश नाईक यांनी शिवसेना सोडली आणि त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत संजीव नाईक यांनी राष्टÑवादीच्या तिकीटावर या मतदार संघावर कब्जा केला. मात्र, त्यांना येथे फार काळ सत्ता टिकविता आली नाही. २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत शिवसेनेने राजन विचारे यांना संधी दिली आणि त्यांनी संजीव नाईक यांचा २ लाख ८५ हजार मतांना पराभव केला. मधल्या काळात मोदी लाट ओसरल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे त्याचा फायदा राष्टÑवादी घेईल असे वाटत होते. त्यानुसार नाईक फॅमिलीमधील कोणीतरी ही निवडणूक लढवेल अशी शक्यता होती. परंतु, त्यांनी माघार घेतल्याने राष्टÑवादीने ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले गणात उतरले आहेत. बहुजन वंचित आघाडीकडून नवी मुंबईस्थित मल्लीकाअर्जुन पुजारी यांचे नाव निश्चित झाले आहे. तर महाराष्टÑ क्रांती सेनेने रवींद्र साळुंखे यांचे नाव घोषीत केले आहे.परंतु खरी लढत ही शिवसेना विरुद्ध राष्टÑवादी अशीच होणार आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचाा २ लाख ८५ हजार मतांनी विजय झाला होता. त्यानंतर विधानसभा, महापालिका निवडणुकांमध्येसुद्धा युतीचे पारडे जड राहिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पुन्हा तोच करिष्मा होईल असा दावा शिवसेना करीत आहे. परंतु राष्टÑवादीने परांजपे यांना उमेदवारी दिली आहे. शहरात काही दिवसांपूर्वी एक बॅनर लागला होता. त्यावर बॅनरवर आपला खासदार कसा असावा उच्च शिक्षित की अल्पशिक्षित असा उल्लेख सवाल केला होता. त्यानंतर भाजपाचे माजी गटनेते मिलिंद पाटणकर यांनी याच मुद्याला धरून सोशल मिडियावर उच्च शिक्षिताच्या बाजूने भूमिका मांडली होती. त्यामुळे येत्या काळात प्रचाराचा हाच मुद्दा घेऊन राष्टÑवादी मैदानात उतरेल, अशी शक्यता आहे. परांजपे यांचे बी.ई. मॅकेनिकल आणि एमबीए (मार्केटिंग) असे शिक्षण झाले आहे. परंतु विचारे हे १२ वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे सोशल मिडियावर सुद्धा हाच प्रचार सुरू असून त्याचा परिणाम ठाणे लोकसभा मतदार संघात वाढलेल्या तरुण मतदारांना विचार करण्यास भाग पाडणारा आहे. शिवाय परांजपे हे पूर्वीचे शिवसैनिकच असल्याने आणि त्यांचे वडील प्रकाश परांजपे यांनी लोकसभेची कारकिर्द गाजविली असल्याने त्यांच्या नावाचा किती फायदा आनंद यांना होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.मनसेच्या इंजिनाला राष्टÑवादीचे घड्याळमनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभेची लढाई ही मोदी विरोधी असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर धूळवडीच्या दिवशी ठाण्यात मनसेच्या इंजिनाला राष्टÑवादीचे घड्याळ जोडले जाऊन आमचा रंग एकच असे दाखविण्यात आले. त्यामुळे मनसेची मते आता या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहेत. मागील निवडणुकीत मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांना ४८ हजार ८६३ मते मिळाली होती. परंतु, त्यानंतर झालेल्या विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकीत मनसेचे पानीपत झाल्याने आता किती मतांचा टक्का राष्टÑवादीला मिळणार हे निकालाच्या दिवशी समजणार आहे.आपची भूमिका गुलदस्त्यातमागील निवडणुकीत आप ने सुद्धा आपला उमेदवार उभा केला होता. संजीव साने यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ४१ हजार ५३५ मते मिळाली होती. परंतु त्यानंतर विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत आप कुठेही दिसून आला नाही. ठाण्यात आंदोलनाच्या माध्यमातून आपचे काही पदाधिकारी मात्र चर्चेत राहिले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत किती मते त्यांच्याकडे आहेत, आणि ती कोणाच्या पारड्यात जाणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.
ठाण्याच्या निवडणुकीत तरुणाईची मते ठरणार निर्णायक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 12:00 AM