लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकींना अखेर ५ जुलैचा मुहूर्त मिळाला आहे. या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून पक्षाकडून कोणाला संधी मिळते, हे या वेळी पाहायला मिळणार आहे.या निवडणुकीसाठी शुक्रवारी दुपारी २ ते सायंकाळी ५.३० दरम्यान अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर ५ जुलैला होणाऱ्या निवडणुकी आधी छाननी आणि उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. मागील वर्षी २२ जूनला ही निवडणूक झाली होती.केडीएमसीचे अ, ब, क, ड, जे, ह, ग, आय, ई, फ असे एकूण १० प्रभाग आहेत. २०१५ मध्ये महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या आणि प्रभाग निहाय पक्षीय बलाबल पाहता सर्वच प्रभाग समित्या या सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या समित्यांवर विराजमान अध्यक्ष हे युतीचेच आहेत. ‘अ’ प्रभागात गोरख जाधव (शिवसेना), ‘ब’ प्रभागात रजनी मिरकुटे (शिवसेना), ‘क’ प्रभागात सुधीर बासरे(शिवसेना), ‘ड’ प्रभागात देवानंद गायकवाड (शिवसेना), ‘फ’ प्रभागात राजन आभाळे (भाजपा), ‘ह’ प्रभागात विद्या म्हात्रे (भाजपा), ‘ग’ प्रभागामध्ये मुकूंद पेडणेकर (भाजपा), ‘आय’ प्रभागात जालिंदर पाटील (भाजपा), ‘ई’ प्रभागामध्ये प्रमिला पाटील (शिवसेना), ‘जे’ प्रभागात संगिता गायकवाड (शिवसेना) हे सध्या अध्यक्षपदी आहेत. प्रभाग अध्यक्षांना एक वर्षाचा कालावधी मिळतो. एप्रिल्ममध्ये अध्यक्षांची मुदत संपल्याने त्याच महिन्यातच नव्याने निवडणुका होऊन नवीन समिती अध्यक्षांची निवड होणे अपेक्षित होते. परंतु, मागील वर्षीही उशिराने निवडणूक झाली होती. आता ५ जुलैला दुपारी १२ चा मुहूर्त मिळाला आहे. या वेळी पिठासीन अधिकारी म्हणून मुंबई शहर जिल्हाधिकारी संपदा मेहता उपस्थित राहणार आहेत.
प्रभाग समिती अध्यक्षांच्या निवडीला ५ जुलैचा मुहूर्त
By admin | Published: June 28, 2017 3:12 AM