ठाणे : बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आराेपी अक्षय शिंदे याच्या पाेलिस चकमकीतील मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याबरोबरच राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फतही (सीआयडी) स्वतंत्र चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी मंगळवारी दिली. हे संपूर्ण प्रकरण आता चाैकशीच्या अधीन असल्याने यावर भाष्य करणे गैर आहे, असेही त्यांनी सांगितले. अक्षयने केलेल्या गुन्ह्याचा तपास सरकार नियुक्त विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) सुरू हाेता. त्याच्या दुसऱ्या पत्नीने त्याच्यावर केलेल्या अनैसर्गिक लैंगिक छळवणुकीच्या आराेपाची ठाणे पाेलिसांकडून चाैकशी सुरू हाेती. याच गुन्ह्यात त्याचा तळाेजा कारागृहातून साेमवारी ताबा घेतल्यानंतर चकमकीचा प्रकार घडल्याची माहिती ठाणे पाेलिसांचे जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी यांनी दिली. पोलिस चकमकीत अक्षय जेथे मारला गेला ते मुंब्रा बायपास स्थळ आणि ज्या वाहनांत हा थरार घडला त्या पोलिस वाहनाचा मुंब्रा पोलिसांनी पंचनामा केला. त्या ठिकाणी न्यायवैद्यक विभागाच्या पथकानेही तपासणी केली.
अक्षयवर पोलिसाच्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
जे घडले, ते धक्कादायक आहे. अक्षयने पाेलिसांवर केलेल्या गाेळीबाराबद्दल त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा आणि त्याच्या आकस्मिक मृत्यूचा असे दाेन गुन्हे मुंब्रा पाेलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती डुंबरे यांनी दिली.
अतिरक्तस्रावाने मृत्यू
मुंबई : अक्षय शिंदेचा मृत्यू डोक्यात गोळी लागल्यानंतर अतिरक्तस्रावामुळे झाल्याचा निष्कर्ष जेजे रुग्णालयाच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालात नोंदविण्यात आला आहे. त्याच्या डोक्याला एकच गोळी लागल्याचे अहवालात म्हटले आहे.
अक्षयचा मृतदेह मंगळवारी जेजे रुग्णालयात आणण्यात आला. त्याच्या शरीरात गोळी अडकलेली नाही ना, याची खातरजमा एक्स-रेद्वारे करण्यात आली. हॅण्डवॉश आणि व्हिसेराची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी होणार आहे.
जवळचे कुणीही नव्हते
मानवी हक्क आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शवविच्छेदन करताना व्हिडीओ शूटिंग करण्यात आले. अक्षयचे जवळचे कुणीही नातेवाईक रुग्णालयात उपस्थित नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली. विच्छेदनानंतर संध्याकाळी मृतदेह मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.