ठाणे : खारघर येथे झालेल्या दुर्घटनेची साधी चौकशी देखील केली जात नाही. मात्र तिकडे पप्पीची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली जाते हे फार दुर्देवी असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. त्यातही राजकीय ताकद दाखविण्यासाठी हा अट्टाहास केला गेला असतांना आता कार्यक्रम दुपारी घेण्यासाठी अप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच सांगितल्याचे सांगत त्यांच्यावर आपले पाप ढकलण्याचा प्रकार केला जात असल्याची टीका देखील त्यांनी केली. परंतु या प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशाच्या माध्यमातून न्यायालयीन चौकशी केली जावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खारघरच्या घटनेचा व्हिडीओ समोर आलेला आहे. परंतु त्यावर एकही वरीष्ठ नेता बोलण्यास तयार नाही. उलट त्याचे पाप आता दुस-याच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची एक सदस्य समिती नेमली आहे. करीर हे अतिशय चांगले अधिकारी आहेत. परंतु मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनी एखाद्या फाईलवर सही करायला सांगितले तर, अधिकारी त्यास नकार देत नाहीत. त्याचप्रमाणे नोकरशहा म्हणून ते सरकार चुकले हे सांगू शकतील का, हा प्रश्न आहे. त्यामुळेच एक सदस्य समिती ऐवजी निवृत्त न्यायधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यातही राज्य सरकारची समिती अशा घटना पुढे घडू नयेत म्हणून पर्याय सुचवेल. पण, उद्याच कोणी बघितले आहे.
तसेच त्या दिवशी घडलेल्या दुर्घटनेचे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. एक सदस्य समिती तयार करून राज्याला मुर्ख बनविण्याचे काम करू नका, धुळफेक करू नका. हि दुर्घटना नेमकी कशी घडली आणि काय चुका झाल्या हे सर्व समोर येऊ द्या. त्यासाठीच न्यायालयीन चौकशी महत्वाची आहे. त्यात सर्व काही समोर येईलच, असेही ते म्हणाले. यापुर्वी अशा दुर्घटना घडल्यानंतर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. खारघर येथे उन्हात नागरिकांना बसविणे हे अमानवी कृत्य होते. त्यामुळेच राज्य सरकारने या दुघर्टनेची जबाबदारी घ्यायला हवी, असेही आव्हाड म्हणाले.