मीरा रोड : मीरा - भाईंदर महापालिकेच्या नालेसफाईच्या कामात ठेकेदाराने अल्पवयीन मजुरांना जुंपल्याने काशिमीरा पोलीस ठाण्यात ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच बालमजुरांना सुधारगृहात पाठवले आहे. पोलिसांनी मूळ ठेकेदार मालक व पालिका अधिकाऱ्यांना मात्र पाठीशी घातल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल शंका व्यक्त होत आहे.
महापालिकेने नालेसफाईसाठी मे. एम. ई. प्रोजेक्ट लि. या कंपनीला नालेसफाई कामी यंत्रसामग्री, वाहने व मजूर पुरवठा करण्याचे कंत्राट दिले आहे. मीरा रोडच्या विनयनगर परिसरातील गटार साफ करण्यासाठी बालमजुरांना जुंपण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने परिमंडल १चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी अनैतिक मानवी वाहतूक शाखेस पडताळणी करून कारवाईचे आदेश दिले.
पोलिसांनी पडताळणी केली असता १६ ते १७ वयोगटातील पाच बालकामगार नालेसफाईचे काम करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना बालसुधारगृहात पाठवले आहे. पोलिसांनी मनोज मयेकर व त्यांचे सुपरवायझर रमेश साहेबराव काळे (३५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मे. एम. ई. प्रोजेक्ट लि. कंपनीच्या मूळ मालकाला व पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आरोपी बनविले नाही.