कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाची दुरवस्था व आर्थिक डबघाईचे चित्र ‘लोकमत’ने ‘आॅन दी स्पॉट’द्वारे मांडल्यानंतर सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी केलेल्या दौऱ्यात पूर्ण तपासणी केल्यानंतरच बस आगाराबाहेर काढा, असे निर्देश केडीएमटीचे व्यवस्थापक देविदास टेकाळे यांना दिले. बसथांब्यांची झालेली दुरवस्था, रिक्षातळांचे अतिक्रमण, आगारातील कार्यालयांची दुरवस्था यावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. या समस्यांची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी आयुक्त ई. रवींद्रन व सभापती चौधरी हे संयुक्तपणे आगारांची पाहणी करणार होते. परंतु, रवींद्रन यांना ऐनवेळी मंत्रालयात एका बैठकीसाठी जावे लागल्याने त्यांच्या अनुपस्थितीत सभापतींना नियोजित दौरा करावा लागला. या वेळी परिवहन सदस्य दीपक भोसले, प्रल्हाद म्हात्रे, संतोष चव्हाण, राजेंद्र दीक्षित, सुरेंद्र आढाव व व्यवस्थापक देविदास टेकाळे होते. शहरातील बसथांब्यांसह वसंत व्हॅली, गणेशघाट व खंबाळपाडा आगारांसह डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातील नियंत्रण कक्ष व डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली जाणार होती. परंतु, बसथांबे आणि गणेशघाट आगाराचीच या दौऱ्यात पाहणी करण्यात आली. डिझेल टँकला झाकणे नसल्याने डिझेलची झालेली गळती, बसमध्ये अग्निरोधक यंत्र नसणे, बसला काचा नसणे, असे प्रकार मध्यंतरीच्या काळात घडले होते. तसेच साध्या व व्होल्वो बसची स्वच्छता नियमितपणे होत नसल्याचे दौऱ्याप्रसंगी निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर आगारातील बस पूर्ण तपासणीअंतीच बाहेर काढण्याच्या सूचना चौधरी यांनी या वेळी दिल्या. प्रवेशद्वारावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून ही तपासणी करून घ्यावी, असे त्यांनी निर्देश दिले. (प्रतिनिधी)>बसथांब्यांच्या पाहणीत ते अटी-शर्तीनुसार बनवण्यात आले नाहीत. त्यावरील जाहिरातीलाच विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. थांब्यांवर कुठली बस आहे, तिची वेळ काय आहे, या माहितीचाही उल्लेख नसल्याचे दौऱ्यात आढळून आले. गणेशघाट आगाराला भेट दिली असता तेथील दुरवस्थेचाही आढावा घेण्यात आला. तेथे तातडीने खडीकरण व डांबरीकरण करावे, असे निर्देश चौधरी यांनी दिले.
पूर्ण तपासणीअंतीच बस आगाराबाहेर काढा
By admin | Published: July 19, 2016 3:17 AM