डोंबिवली : आहार किती आणि कसा घ्यावा, यावरून आहारतज्ज्ञांमध्येच अनेक मतप्रवाह दिसून येतात. काही दोन वेळा खाण्याचा सल्ला देतात, तर काही थोड्याथोड्या वेळाने खा, असे सांगतात. त्यामुळे कोणती आहारपद्धती अवलंबावी, याबाबत सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. मात्र, प्रत्येकाने शरीरप्रकृतीनुसार आपल्याला सोसेल एवढाच आहार घेतल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते उपकारक ठरेल, असा सल्ला डॉ. अमित डांगे यांनी दिला.एका रुग्णालयातर्फे शनिवारी सर्वेश सभागृहात ‘आरोग्य हिताय आरोग्य सुखाय’ याअंतर्गत झालेल्या व्याख्यानमालेत ‘मला बारीक व्हायचंय’ या विषयावर डॉ. डांगे बोलत होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात डॉ. चिंतन सांगाणी यांनी ‘मधुमेह बरा होतो का’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.डॉ. डांगे म्हणाले की, शरीरप्रकृती ही वात, कफ, पित्त प्रवृत्तीने बनलेली असते. त्यामुळे शरीरप्रकृती जाणून प्रत्येकाने आपला आहार ठेवायला हवा. कफप्रकृतीच्या व्यक्तींनी दिवसातून दोनदाच खावे, तर ज्यांना कधी भूक लागते, कधी लागत नाही, अशा व्यक्तींनी दोन ते तीन वेळा खाण्यास हरकत नाही. दुधातून आंबा वगळता दुसरे कोणतेच फळ खाऊ नये. आहार नियंत्रण होत नाही, तोपर्यंत वजन कमी होणार नाही. आहारात कर्बोदके आणि प्रोटीनचा वापर जास्त करावा. आपण ज्या प्रदेशात राहतो, त्या पद्धतीचाच आहार ठेवावा. आपण खात असलेल्या पदार्थांमध्ये किती कॅलरी आहेत, त्यांचा विचार करावा. वडापाव, पोहे, उपमा यात ज्वारी आणि नाचणीपेक्षा जास्त कॅलरी असतात. त्यामुळे भाकरी खाणे केव्हाही उत्तम असते. कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांना जास्त प्राधान्य द्यावे. दररोज सायकल चालवावी. त्यासारखा दुसरा चांगला व्यायाम नाही, असे ते म्हणाले....तर इन्सुलिनचा तुटवडा जाणवेल!डॉ. सांगाणी म्हणाले की, २०३० मध्ये आठ कोटी लोकांना इन्सुलिनची गरज भासून इन्सुलिनचा तुटवडा जाणवेल. त्यामुळे हा आकडा कमी करण्यावर भर हवा. केवळ साखर न खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित होत नाही. आम्लपदार्थ म्हणजेच सॉस, पाणीपुरी यामुळेही मधुमेह बळावतो. लोकांना वाटते की, आम्ही साखर किंवा गोड पदार्थ खात नाही, तरीही मधुमेह नियंत्रणात का राहत नाही. आहारात मीठ जास्त वापरले, तरी मधुमेह वाढतो. पनीर, चीज हे पदार्थही मधुमेही व्यक्तींनी टाळावेत, असे त्यांनी सांगितले.
'शरीराला सोसेल एवढाच आहार घ्यावा'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 2:45 AM