मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी २६ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून २४ रोजी इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरावा लागणार आहे. महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने भाजपमधून ज्योत्स्ना हसनाळे, दौलत गजरे, नीला सोन्स व रूपाली मोदी असे चौघे इच्छुक आहेत. उपमहापौरपदासाठी ध्रुवकिशोर पाटील यांचे नाव असले, तरी विद्यमान उपमहापौर चंद्रकांत वैती, रवी व्यास, सुरेश खंडेलवाल हेही इच्छुक आहेत.
मीरा-भार्इंदर महापालिकेत भाजपचे ६१, शिवसेनेचे २२, तर काँग्रेस आघाडीचे १२ नगरसेवक आहेत. महापौर, उपमहापौरपदाची मुदत २७ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बावीकर यांच्या अध्यक्षतेखाली महापौरपदाची निवडणूक होईल. यंदाचे महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या प्रवर्गातून भाजपच्या ज्योत्स्ना हसनाळे, रूपाली शिंदे-मोदी, दौलत गजरे हे तिघे इच्छुक होते. पण, सोन्स यांनीही जातीचा दाखला हाती येताच महापौरपदासाठी दावा केल्याने भाजपमध्ये इच्छुकांची संख्या चार झाली आहे. उपमहापौरपदासाठी वैती पुन्हा इच्छुक असले, तरी त्यांचा पत्ता कापून पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. उपमहापौरपदासाठी भाजपचे रवी व्यास, सुरेश खंडेलवाल, मदन सिंग हेही इच्छुक आहेत.मेहता सांगतील तेच अंतिम उमेदवारविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व रवींद्र चव्हाण यांच्याशी मेहतांचे असलेले सलोख्याचे संबंध पाहता ते सांगतील तेच उमेदवार अंतिम असतील, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे स्थायी समिती, स्वीकृत नगरसेवक तसेच अन्य समित्यांमध्ये सदस्य नियुक्तीत डावलण्यात आलेल्या आमदार गीता जैन यांना महापौर, उपमहापौरच्या उमेदवारीतही डावलले जाणार, असे स्पष्ट संकेत मेहतांच्या गोटातील सूत्रांनी दिले.