घोडबंदर : बांधकाम व्यावसायिकाच्या हत्याप्रकरणात दोषी आढळलेले ठाणे महापालिकेचे नगरसेवक राजा गवारी यांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून सध्या ते नाशिक कारागृहात सजा भोगत आहेत. गंभीर गुन्ह्यात दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधीला त्या पदावर ठेवता येत नसल्याने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गवारी यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे. यासंदर्भात प्रशासनाने नाशिक कारागृह व गवारी यांच्या घरी नगरसेवकपद रद्द केल्याची नोटीस दिली आहे.ठाण्यात घडलेल्या परमार आत्महत्या प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या चार नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून बुधवारी झालेल्या महासभेसमोर येणार असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या होत्या. या नगरसेवकांवरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. तसेच त्यांना दोन वर्षांपेक्षा अधिकची सजा सुनावली गेली नसल्याने त्यांच्यावरील कारवाईमागे राजकीय संशय व्यक्त केला जात होता. त्याच वेळी मागील महिन्यात ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने नगरसेवक गवारी आणि त्यांचे साथीदार यांना जन्मठेपेची सजा सुनावली असताना त्यांच्यावरील कारवाईची दखल घेण्यात आलेली नव्हती.मात्र, त्या चार नगरसेवकांवर कारवाई करताना गवारी यांच्याबाबत जाब विचारला जाऊ शकतो, याची प्रशासनाला जाणीव होताच बुधवारी सकाळी गवारी यांचे पद रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. ११ ते २.३० वाजेपर्यंत सर्व सोपस्कार पूर्ण होऊन आयुक्तांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या मसुद्यावर सही केली. या पत्राचा लखोटा लागलीच नाशिक कारागृह आणि गवारी यांच्या घरी धाडल्याची माहिती सूत्रांनी दिली. (वार्ताहर)
अवघ्या अडीच तासांत गवारींचे नगरसेवकपद रद्द
By admin | Published: April 22, 2016 1:55 AM