- सदानंद नाईकउल्हासनगर - महापौरपदासाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाकडून पंचम कलानी, डिम्पल ठाकूर यांनी, तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर साई पक्षाच्या फुटीर गटाच्या ज्योती भटिजा यांनी अर्ज दाखल केला. भाजपा व शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, भारिप या पक्षांच्या नगरसेवकांचा भाव वधारला आहे. त्यामुळे या पक्षांच्या नगरसेवकांना खेचण्याकरिता भाजपा-शिवसेनेची रस्सीखेच सुरू झाली आहे.महापालिकेत भाजपा-ओमी टीम व साई पक्षाची सत्ता असून महापौरपदाच्या टर्मपैकी प्रत्येकी सव्वा वर्षाचे महापौरपद आयलानी व कलानी यांना विभागून दिले. त्यानुसार, मीना आयलानी यांनी महापौरपदाचा सव्वा वर्षानंतर राजीनामा दिला. महापौरपदाची निवडणूक २८ सप्टेंबर रोजी होत असून आश्वासनाप्रमाणे भाजपाने पंचम कलानी यांना महापौरपदाची उमेदवारी दिली. पंचम कलानी यांनी सोमवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष कुमार आयलानी, माजी महापौर मीना आयलानी, साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी आदी उपस्थित होते. यावेळी डमी उमेदवार म्हणून डिम्पल ठाकूर यांनीही अर्ज दाखल केला.साई पक्षाच्या फुटीर गटाच्या नगरसेविका ज्योती भटिजा यांनी शिवसेनेच्या मदतीने अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे आदी उपस्थित होते. शिवसेनेचे २५, रिपाइं-पीआरपी गटाचे ३, राष्ट्रवादीचे ४, साई पक्षाच्या फुटीर गटाचे ७, काँग्रेस व भारिप प्रत्येकी एक असे एकूण ४१ नगरसेवक भटिजा यांच्यासोबत असल्याचा दावा शिवसेनेने केला, तर भाजपाचे ३१, साई पक्षाचे १२ असे एकूण ४३ नगरसेवकांचे संख्याबळ आपल्यासोबत असल्याचा तसेच इतर पक्षांचे काही नगरसेवक भाजपा आघाडीसोबत येत असल्याची प्रतिक्रिया शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दिली. भाजपा व शिवसेनेने आपलाच महापौर होणार, असा दावा केला आहे. अर्थात, दोन्ही पक्षांकडून काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप व रिपाइंची मते खेचण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.सत्तेची चावी काँगे्रस, भारिप, राष्ट्रवादीकडे आहे. भाजपा आघाडीतील साई पक्षात फूट पडल्याने शिवसेनेची बाजू भक्कम झाली आहे. मात्र, दोन्ही काँग्रेस आणि भारिप, रिपाइंचे नगरसेवक मोठ्या संख्येने भाजपाने आपल्याकडे खेचले, तर साई पक्षाची फूट शिवसेनेला लाभदायक ठरणार नाही. छोट्या पक्षांकरिता दोन्ही पक्षांनी गळ टाकल्याने घोडेबाजाराला ऊत आला आहे.ओमी कलानी टीम गैरहजर : पंचम कलानी यांनी अर्ज दाखल केला, त्यावेळी ओमी टीमचे सदस्य गैरहजर होते. खुद्द पंचम कलानी यांनी मी भाजपाची नगरसेविका असून शहर विकासासाठी भाजपाची सत्ता येणार असल्याचे सांगितले. ओमी कलानी अर्ज दाखल करतेवेळी गैरहजर राहिल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पंचम यांना विजयी करण्याची जबाबदारी कलानी यांनी भाजपाच्या गळ्यात घातली आहे. कलानी यांनी नेहमीच उल्हासनगरावर सत्ता केली. साई पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर पंचम यांना दगाफटका होण्याची चिन्हे दिसली, तर ऐनवेळी त्या माघार घेऊन डमी उमेदवार डिम्पल ठाकूर यांना रिंगणात उतरवले जाईल.महापालिकेवर भाजपा-ओमी टीम व साई पक्षाच्या आघाडीची सत्ता आहे. मात्र, गेल्या दीड वर्षाच्या काळात आश्वासनापलीकडे विकास झाला नसल्याने शिवसेनेसोबत गेलो आहे.- ज्योती भटिजा, महापौरपदाच्या उमेदवार, शिवसेना
‘साई’च्या फुटीर ज्योती भटिजा शिवसेना उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 3:21 AM