उल्हासनगर : फाळणीनंतर सिंधी बांधवानी स्थापन केलेल्या चालिया मंदिरात पाकिस्तानमधील मुख्य चालिया मंदिरातून आणलेल्या पवित्र ज्योतीला ७५ वर्ष पूर्ण झाले आहे. सतत तेवत राहत असलेल्या या ज्योतीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे.
फाळणीच्या वेळी विस्थापित झालेल्या काही सिंधी बांधवाना कल्याण शेजारील ब्रिटिश छावणीत वसविण्यात आले. तसेच या विस्थापित छावणीला शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीवरून भारताचे पहिले गव्हर्नर सी गोपालचार्य यांनी उल्हासनगर नाव देण्यात आले. सॅन १९४७ पूर्वी अखंड हिंदुस्थान असताना पाकिस्तानातील सिंध प्रांतात असणाऱ्या पिरघोट शहरात प्रसिद्ध चालिया मंदिरात ही ज्योत ५० वर्षे तेवत होती. सिंधी बांधवाची श्रद्धास्थान असलेल्या चालिया मंदिराची आठवण म्हणून कॅम्प नं-५ परिसरात दुसरे नवीन चालिया मंदिर बांधून पाकिस्तान मधील मुख्य चालिया मंदिरातून सतत तेवत असलेली ज्योत उल्हासनगरातील चालिया मंदिरात सुरक्षितपणे आणली. याच ठिकाणी चालिया उत्सव धुमधडाक्यातत साजरा होत असून देशविदेशातील लाखो सिंधी बांधव याठिकाणी दर्शन करण्यासाठी येतात.
शहरातील चालिया मंदिरात सतत ७५ वर्ष ज्योत तेवत आहे. पाकिस्तान ते उल्हासनगर अशा १२५ वर्षांपासून ही ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्यात आली आहे. या ज्योतीची अखंडपणे तेवत राहण्याची माहिती गंगोत्री फाऊंडेशनचे भारत गंगोत्री, सोनिया धामी यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडे पाठवली होती. लक्ष वेधणारी आणि अवाक करून सोडणारी ही माहिती बघितल्यावर या ज्योतची रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डची टीम १७ ऑगस्ट रोजी मंदिरात येणार असून त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र पुरस्कार, ट्रॉफी देण्यात येणार आहे.
याशिवाय इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्डवाइड बुक ऑफ रेकॉर्ड यांनीही सतत तेवत राहणाऱ्या ज्योतीचे कौतूक करून तसे पत्र पाठवले आहे. या पवित्र ज्योतची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड बुक मध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती भारत गंगोत्री,सोनिया धामी यांनी दिली आहे.