मीरा रोड : रस्त्याला आधीच महात्मा जोेतिबा फुले यांचे नाव असतानाही त्याला स्वत:च्या बिल्डर सासऱ्याचे नाव देणाऱ्या भाजपा नगरसेविकेला त्यांनी लावलेले फलक ‘लोकमत’च्या बातमीनंतर रातोरात हटवावे लागले आहेत. एवढेच नव्हे, तर महापालिकेने त्यांना दिलेली नामकरणाची परवानगीही रद्द करतानाच महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाचे फलक नव्याने त्याचजागी लावल्याने जयंतीच्या दिवशी नागरिकांना ते फलक पुन्हा पाहण्याचा योग आला. मनसे आणि आरपीआयने (आठवले गट) जोेतिबांचे नाव हटवल्याचा निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला होता. शहरातील रस्ते, चौक नामकरणाचा विषय गेल्यावर्षी १५ आॅक्टोबरच्या विशेष महासभेत आणण्यात आला होता. प्रत्यक्षात गोषवाऱ्यात आयुक्तांनी नामकरणाचे ५८ प्रस्ताव आयुक्तांनी दिले होते. मात्र नगरसेवकांनी आपापल्या मर्जीतील आणि सोयीची नावे वाढवून १०१ प्रस्ताव मंजूर केले. त्यात ९४ क्रमांकावर जागृती इमारत ते रामगोपाल सदनापर्यंतच्या रस्त्याला चंदूभाई रावल यांचे नाव देण्याचे नमूद करण्यात आले. भाजपा नगरसेविका मेघना दीपक रावल यांनी आपले बिल्डर सासरे चंदूभाई रावल यांचे नाव देण्याची मागणी केली होती. हा ठराव भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी मांडला होता, तर दिनेश जैन यांनी त्याला अनुमोदन दिले होते. महापौर गीता जैन यांनी तो सर्वानुमते मंजूर केला होता. मात्र महासभेत ठराव मंजूर होतानाही ज्या रस्त्याला आधीच एखादे नाव दिलेले आहे, त्यात बदल करून नये असे मी स्पष्ट केल्याचे महापौर जैन यांचे म्हणणे आहे. त्यानंतर ठरावा आधार घेत५ एप्रिलला बांधकाम विभागाने अटी-शर्ती टाकून नामकरणाचा फलक लावण्यास मेघना यांना परवानगी दिली होती. वास्तविक जागृती इमारत ते फाटकापर्यंतच्या रस्त्याला २००१ मध्येच महात्मा जोतिबा फुले यांचे नाव दिलेले असताना व त्यांच्या नावाची पाटी तेथे असतानाही त्याच रस्त्याच्या काही भागाला रावल यांच्या नाव देण्यास मंजुरी देण्यात आली. भाजपा नगरसेविका मेघना दीपक रावल यांनी आपले बिल्डर सासरे चंदूभाई रावल यांचे नाव देण्याची मागणी केली होती. रावल यांनी पालिकेने लावलेल्या नामफलकावरील जोतिबांचे नावही चुना लावून पुसून टाकले होते. ‘लोकमत’च्या हॅलो ठाणे पुरवणीत रविवारी त्याबाबतचे वृत्त छायाचित्रांसह प्रसिद्ध होताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. रविवारीच पालिकेने मेघना रावल यांना पत्र दिले आणि या रस्त्याला आधीच महात्मा फुले यांचे नाव दिलेले असल्याने रावल यांच्या नामकरणाची नजरचुकीने दिलेली परवानगी रद्द करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांनी स्पष्ट केले.
मीरा रोडच्या रस्त्याला पुन्हा जोतिबांचे नाव
By admin | Published: April 12, 2016 1:01 AM