डोंबिवली : डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पेंढरकर कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, विद्यापीठाच्या अनुदान आयोगाने (यूजीसी) दहा वर्षांच्या कालावधीसाठी या महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा दिला आहे.
यासंदर्भात यूजीसीचे १७ फेब्रुवारीचे पत्र महाविद्यायाला मिळाले असल्याचे महाविद्यालयाने शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. स्वायत्त दर्जा मिळवणे किंबहुना तो प्राप्त करणे, हा महाविद्यालयासाठी आणि आमच्या संस्थेच्या सबंध शैक्षणिक योगदानासाठी मोठा आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे आम्हाला आमची शैक्षणिकदृष्टी वाढविण्यास आणि जास्तीत जास्त विदयार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास सक्षम केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना यशाच्या मार्गावर नेण्यात नक्कीच भरघोस मदत होईल, असा विश्वास डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांनी व्यक्त केला.
स्वायत्त दर्जा मिळाल्यामुळे महाविद्यालय आता स्वतंत्रपणे अभ्यासक्रम तयार करू शकणार आहे. परदेशी विद्यापीठांमध्ये सहयोग करू शकेल, परीक्षा घेऊ शकेल आणि स्वतंत्र कोर्स फी तयार करू शकेल, असे ते म्हणाले. तसेच नॅकद्वारा महाविद्यालयाला ए ग्रेड देऊन मान्यता देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शहरातच नव्हे, तर पंचक्रोशीत सुमारे ४० वर्षे जुने असलेल्या या महाविद्यालयातून जगभर विविध क्षेत्रातील दिग्गज यांच्या कार्यक्षेत्रात नैपुण्य मिळवत असल्याचा आनंद, समाधान असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
------------
कॉलेजचा फोटो आहे