ठाणे - वारंवार नोटिसा बजावून, जनजागृती करूनही शहरातील सोसायट्यांसह हॉटेल आणि मॉलचालकांनी कचरा विल्हेवाटीचा प्रश्न न सोडवल्याने अखेर ठाणे महापालिकेने अशा तब्बल ४०० हून अधिक आस्थापनांची कचराकोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, उद्यापासून (१५ जून) त्यांचा कचरा न उचलण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिका हद्दीत आजघडीला सुमारे ७५० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. परंतु, पालिकेला अद्यापही हक्काचे डम्पिंग मिळू शकलेले नाही. केवळ ठाणे महापालिकेचीच ही गत नसून देशातील इतर महापालिकांचीदेखील हीच ओरड असल्याने यावर काहीतरी उपाय करावेत, यासाठी एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.त्यानंतर, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार केंद्र सरकारने यासंदर्भात मागील वर्षी एक अध्यादेश काढला आहे. त्यात ज्या सोसायट्या अथवा आस्थापना यांच्याकडून प्रतिदिन १०० किलोग्रॅमपेक्षा जास्तीच्या कचºयाची निर्मिती होते तसेच ज्या सोसायट्या पाच हजार स्क्वेअर मीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, त्यांनी त्यांच्या कचºयाचे वर्गीकरण करून त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी, असे स्पष्ट केले आहे.त्यानुसार, आता ठाणे महापालिकेने मागील वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांपासून शहरातील अशा आस्थापनांचा सर्व्हे केला होता. त्यानुसार, तब्बल चारशेहून अधिक सोसायट्या, हॉटेल, मॉल, रुग्णालय आदींना नोटिसा बजावल्या होत्या. याविरोधात महासभेत लोकप्रतिनिधींनी आवाज उठवल्यानंतर पालिकेने कचºयाची विल्हेवाट कशी लावावी, यासाठीचे प्रदर्शनही आयोजित केले होते. त्यानंतर, पुन्हा नोटीस देण्याचा पत्रप्रपंच केला होता. परंतु, यानंतरही या सोसायट्यांनी कोणत्याही हालचाली न केल्याने अखेर महापालिकेने या आस्थापनांचा कचरा न उचलण्याचे निश्चित केले आहे.दरम्यान, मालमत्ताकरातच कचराकरही वसूल केला जात असल्याने पालिकेनेच कचºयाची विल्हेवाट लावावी, अशी मागणी काही सोसायट्यांनी केली होती. परंतु, पालिकेने ही मागणी अमान्य करून आपले धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी प्रशासनाने १५ दिवसांपूर्वी गृहसंकुले आणि आस्थापनांना पुन्हा नोटिसा दिल्या होत्या. यामध्ये १५ जूनपासून कचरा उचलणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, उद्यापासून या आस्थापनांची कचराकोंडी होणार आहे.हॉटेल, मॉल अडचणीतमहापालिकेच्या उथळसर भागात २१, कळवा २३, नौपाडा ४७, लोकमान्यनगर-सावरकरनगर ७०, माजिवडा-मानपाडा भागातील १३४ आणि वर्तकनगर भागातील ६१ आस्थापनांना याचा फटका बसणार आहे. तसेच शहरातील मोठे मॉल, हॉटेल, रुग्णालयांचादेखील पालिकेने यात समावेश केल्याने त्यांचा कचरादेखील आता उचलणे बंद होणार आहे.
ठाण्यात आजपासून कचराकोंडी, नोटिसांनंतरही वर्गीकरण न करणे ४०० आस्थापनांना भोवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 5:11 AM