भिवंडी : शहरातील सोसायट्यांना पालिका कचराकुंड्या देणार आहे. शहरात कचरा टाकण्यासाठी फायबरच्या कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे ८५ लाखांचा प्रस्ताव आयुक्त योगेश म्हसे यांनी गुरुवारी होणाऱ्या महासभेत ठेवला आहे. स्वच्छता विभागाने नागरिकांकडून कचरा उचलण्यासाठी घंटागाडीचे कंत्राट दिले होते. मात्र, या घंटागाड्या शहरात फिरत नसल्याने नागरिक कुंडीत कचरा टाकतात. याबाबत, वारंवार तक्रारी करूनही स्वच्छता विभागातील अधिकारी व पालिका प्रशासनाने घंटागाडी कंत्राटदारावर कारवाई केली नाही. ही योजना २००१-२००२ मध्ये यशस्वी ठरली होती. शहरातील कचराकुंड्या बंद झाल्या होत्या. परंतु, सध्याच्या प्रशासनाकडून ही योजना अपयशी ठरल्याने शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर कचरा साचलेला दिसतो. आयुक्त योगेश म्हसे यांनी ८५ लाख ८० हजार ६०० रुपयांच्या १२० लीटर क्षमतेच्या २७०० फायबर कचराकुंड्या मागवण्याचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवला आहे. त्यापैकी १ हजार १८५ सोसायट्यांना ओला व सुका कचरा टाकण्यासाठी प्रत्येकी दोन फायबर कचराकुंड्या देणार आहेत. उरलेल्या फायबरच्या कचराकुंड्या शहरातील विविध ठिकाणी ठेवणार आहेत. प्रत्येक मालमत्ताधारकास ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी कचराकुंडी द्यावी, अशी मागणी भिवंडी नागरिक विकास समिती (नियोजित) चे सचिव रामदास दानवले यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
सोसायट्यांना देणार कचराकुंडी
By admin | Published: March 16, 2017 2:50 AM