वसंत भोईर, वाडाकुडूस हे वाडा तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असून औद्योगिक करणाचे मुख्य केंद्र आहे. येथे दर शुक्रवारी आठवडा बाजार भरतो. त्यात ग्राहकांची गर्दी उसळते. मात्र आता या बाजारावर मंदीचे सावट पसरले असल्याने बाजारातील खरेदी निम्म्याने घटली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या या बाजारातील खरेदी निम्म्याने घटल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. कुडूस ही ५२ गावाची बाजारपेठ असून या गावाची लोकसंख्या सुमारे ३० ते ३५ हजारांच्या आसपास आहे. तसेच या परिसरात शेकडो कारखाने असल्याने हजारो कामगार येथे वास्तव्यास आले आहेत. यामध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे स्थानिक व परप्रांतीय नागरिकांची गदीॅ आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात असते. पूर्वी अर्धा दिवस हा बाजार चालायचा पण आता मात्र तो पूर्ण दिवस असतो. या बाजारात भाजीपाला, कांदे बटाटे, मसाल्याचे पदार्थ, विविध प्रकारची भांडी, ओली मच्छी, सुकी मच्छी, कपडे, किराणा सामान, चपला व बूट, कडधान्ये, मिठाईची दुकाने, गावठी पालेभाज्या, खाद्यतेल, मसाला व हळदीची दुकाने असतात. या बाजारात सुमारे ६०० छोटे मोठे व्यापारी आपल्या मालाची विक्री करण्यासाठी येतात. पूर्वी या बाजारात प्रचंड गर्दी असायची पूर्ण दिवस बाजारात गर्दी असायची मात्र गेल्या सहा महिने वषार्पासून मंदीचे सावट असल्याने व येथील अनेक कारखाने बंद पडले असल्याने या बाजारात खरेदीचे प्रमाण निम्म्याने घटले असल्याची माहिती येथील व्यापारी सागर गुप्ता या व्यापा-याने दिली. पूर्वी आम्ही चार वाजताच आमचा माल संपवून घरी परतायचो पण आता कमी ग्राहक बाजारात येत असल्याने निम्म्याने विक्रीचे प्रमाण घटले आहे. वाड्यातील अनेक कारखाने बंद पडत आहेत. लोखंडाचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना विजेच्या वाढत्या दरामुळे उत्पादन करणे परवडत नसल्याने सुमारे ३० टक्के कारखाने बंद पडले आहेत. या कारखान्यात काम करणारा परप्रांतीय कामगार आपल्या गावाकडे गेल्याने येथील नागरिकांचे प्रमाण घटले आहे. आणि त्याचा परिणाम या आठवडा बाजारावर झाला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या बाजारात लहान मोठे असे ६०० व्यापारी येत असतात. या व्यापाऱ्याकडून प्रत्येकी दहा ते वीस रुपये कर ग्रामपंचायतीला देण्यात येतात. या करा पोटी आठ ते नऊ हजार रुपयांचे उत्पन्न ग्रामपंचायतीना प्रत्येक आठवड्याला मिळत असल्याची माहिती या ग्रामपंचायतीचे सरपंच कुमार जाबर यांनी दिली. पूर्वी या बाजारात प्रचंड गर्दी असायची मात्र आता गदीॅ कमी प्रमाणात दिसून येते असेही जाबर यांनी सांगितले. शुक्रवारी येथील कारखान्यांना सुट्टी असते. त्यामुळे सर्वजण आठवड्याचे किराणा, भाजीपाला व इतर सामान येथूनच खरेदी करीत असतात. परप्रांतीय कामगारांमुळेच या आठवडा बाजाराला जास्त महत्व आले आहे. वाडा तालुक्यात खानिवली, शिरीषपाडा, गोऱ्हे, कंचाड या ठिकाणीही आठवडा बाजार भरतो मात्र कुडूस येथील आठवडा बाजार हा सर्वात मोठा असतो. (वार्ताहर)
कुडूस आठवडा बाजारावर मंदीचे सावट
By admin | Published: February 08, 2016 2:26 AM