कल्याण : जमिनीच्या वादातून पुतण्याची गोळ्या झाडून हत्या करणाºया काकाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हत्या करणे आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करणे, अशा दोन गुन्ह्यांत शिक्षा झाली आहे. मात्र, पुराव्याअभावी काकीची निर्दाेष सुटका झाली आहे, अशी माहिती सरकारी वकील अॅड. रचना भोईर यांनी दिली.विश्वास कचरू म्हसकर असे हत्या झालेल्या पुतण्याचे नाव आहे. तर, शिक्षा झालेल्या काकाचे नाव बाळाराम गोविंद म्हसकर असे आहे. बदलापूर परिसरातील वाळवली गावात जमिनीच्या वादातून बाळाराम आणि विश्वास यांचे कडाक्याचे भांडण झाले होते. यात बाळाराम याने लाकडी दांडक्याने मारहाण करून विश्वासच्या डोक्यात स्वत:कडील परवानाधारक पिस्तुलामधून गोळी झाडली होती. यात विश्वासचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना ६ मार्च २०११ ला घडली होती. याप्रकरणी विश्वासचा भाचा गिरीश काळू जोशी याने दिलेल्या तक्रारीवरून बदलापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून काका बाळारामसह त्याची पत्नी आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. अल्पवयीन मुलाची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात करण्यात आली, तर बाळाराम आणि त्याची पत्नी सुरेखा या दोघांविरोधात हत्येच्या आरोपाखाली खटला चालवण्यात आला.सत्र न्यायालयात झालेल्या खटल्याचे कामकाज सरकारी वकील म्हणून अॅड. भोईर यांनी पाहिले. तर, पोलीस हवालदार संतोष करंजकर यांचे या वेळी विशेष सहकार्य लाभले.कल्याण जिल्हा सत्र न्यायाधीश न्या. एस.पी. गोगरकर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान १४ साक्षीदार तपासण्यात आले. नुकताच या खटल्याचा निकाल देण्यात आला. लाकडी दांडक्यांनी मारहाण करून दुखापत करणे, या गुन्ह्याप्रकरणी दोन वर्षे सजा आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास एक महिना जादा कैद, तर हत्येच्या गुन्ह्यात बाळारामला जन्मठेप आणि पाच हजारांचा दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्या पत्नीची मात्र निर्दाेष मुक्तता झाली.
पुतण्याच्या हत्येप्रकरणी काकाला जन्मठेप, सत्र न्यायालयाचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:46 AM