उल्हासनगर : मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा तर राष्ट्रीय प्रभारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी रॅली घेऊनही भाजपचे कुमार आयलानी यांचा फक्त एक हजार ८९१ मतांनी विजय झाला. एकाकी लढलेल्या ज्योती कलानी यांचा पराभव होऊनही त्यांचे कौतुक होत आहे. रिपाइंचे बंडखोर भगवान भालेराव यांनी तिसऱ्या क्रमांकाची आठ हजार १२२ मते, तर नोटाला चार हजार ८७१ मते पडली.
उल्हासनगर मतदारसंघातून भाजपचे कुमार आयलानी व राष्ट्रवादी पक्षाच्या ज्योती कलानी यांच्यात लढत झाली. ज्योती कलानी यांच्या प्रचाराची धुरा मुलगा ओमी व सून महापौर पंचम यांच्या खांद्यावर होती. कलानी यांच्या प्रचारासाठी पक्षाचा एकही मोठा नेता आला नाही.
आयलानी यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. मात्र १३, १४ व १७ व्या फेरीत कलानी यांनी आघाडी घेतल्याने आयलानी यांची एकूण आघाडी ९०० मतांवर आली. गेल्या निवडणुकीप्रमाणे कलानी या आयलानी यांच्या मतांची आघाडी तोडणार, असे वाटत होते. मात्र, शेवटपर्यंत आयलानी यांनी आघाडी कायम ठेवली. अखेर, विसाव्या फेरीत आयलानी यांना एकूण ४२ हजार ९४४, तर कलानी यांना ४१ हजार ५० मते मिळाली. तिसºया क्रमांकावर रिपाइंचे बंडखोर भगवान भालेराव राहिले.
भाजपच्या दबंगगिरीने कुमार आयलानींचा विजयउल्हासनगर : भाजपच्या दबंगिरीमुळे कुमार आयलानी यांचा विजय तर पराभूत झालेल्या ज्योती कलानी वनमॅन आर्मी ठरल्या. स्वत:च्या ताकदीवर लढून फक्त १ हजार ८९१ मतांनी पराभूत झालेल्या ज्योती कलानी यांचीच चर्चा शहरात अधिक आहे.
उल्हासनगर मतदारसंघातून कलानी कुटुंबाची सून व महापौर पंचम कलानी, भाजपचे माजी आमदार व शहराध्यक्ष कुमार आयलानी इच्छुक होते. पालिकेत भाजप व ओमी कलानी टीम सत्तेत असल्याने पक्षाने व मुख्यमंत्री यांनी कलानी कुटुंबाला कामाला लागण्याचे संकेत दिल्यावर, त्यांनी प्रचारास सुरूवात केली.
दरम्यान, ज्योती कलानी यांनी पंचम कलानी यांचा प्रचार करता यावा म्हणून राष्ट्रवादी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला दोन दिवस असताना पंचम यांच्या ऐवजी कुमार आयलानी यांना उमेदवारी देण्यात आली. याप्रकाराने नाराज झालेल्या कलानी कुटुंबाने ज्योती कलानी यांना राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरविले. कुमार आयलानी यांनी शिवसेना, साई व रिपाइंच्या मदतीने प्रचारात आघाडी घेतली.
ज्योती कलानी यांचा प्रचार करणाºया भाजपतील ओमी कलानी टीम समर्थक १८ नगरसेवकांना कारवाईच्या नोटिसा पक्षाने दिल्या. या प्रकाराने भाजपतील ओमी समर्थक बहुतांश नगरसेवक प्रचारासाठी पुढे आले नाही. मात्र पंचम, शुभांगी निकम, दीपा पंजाबी यांनी नोटिसला केराची टोपली दाखवून प्रचार केला.
कलानी महलात शांतताउल्हासनगर : भाजपचे कुमार आयलानी यांचा विजय झाल्याने आयलानी समर्थकांनी एकच जल्लोष केला. तर ज्योती कलानी यांच्या कलानी महलमध्ये शांतता पसरली. ज्योती कलानी, ओमी कलानी व महापौर पंचम कलानी यांच्यासह बहुतांश समर्थकांचा मोबाइल बंद होता.
सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. प्रारंभी म्हारळ, कांबा व वरप गावातून आयलानी यांनी आघाडी घेतली. यावेळी मतमोजणी केंद्रात ज्योती कलानी, ओमी कलानी यांंच्यासह कुमार आयलानी उपस्थित नव्हते. पहिल्यापासून आघाडी घेणाºया आयलानी १३ व १४ व्या फेरीत पिछाडीवर गेल्या. मात्र आघाडी कायम होती. २०१४ मध्ये अशीच आघाडी आयलानी यांनी घेतली होती. मात्र शेवटच्या काही फेरीत ज्योती कलानी यांनी आघाडी घेत आयलानी यांचा पराभव केला होता. तसाच प्रकार आतातर नाही ना? या भीतीपोटी आयलानी मतमोजणी केंद्रात शेवटच्या फेरीपर्यंत फिरकले नाही.
ज्योती कलानी पहिल्या फेरीपासून पिछाडीवर पडल्याने ज्योती कलानी यांच्यासह ओमी कलानी व कट्टर समर्थक मतमोजणी केंद्रात आले नाही. आयलानी यांनी शेवटच्या फेरीत निर्णायक आघाडी घेतल्यावर, भाजपा पदाधिकाऱ्यांनी आयलानी यांना मतमोजणी केंद्रात बोलावले. आयलानी यांच्या येण्यापूर्वीच शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी हे समर्थकासह आले होते. आयलानी मतमोजणी केंद्रात येताच समर्थकांनी जल्लोष केला. मतमोजणी केंद्राबाहेर भाजप समर्थकांनी ढोलताशाचा गजर केला. पुन्हा मतदारसंघ आपल्या ताब्यात आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. एकूणच येथील उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता लागली होती. कारण कलानी आणि आयलानी यांनी येथून उमेदवारी मागितल्याने मुख्यमंत्री कुणाला तिकीट देणार हे महत्वाचे होते.फटाक्यांची आतषबाजी
कुमार आयलानी यांचा विजय झाल्याचे जाहीर झाल्यावर शहरातील विविध चौक व परिसरात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. पेढे वाटण्यात आले. नगरसेवक प्रकाश माखिजा, प्रदीप रामचंदानी, मनोज लासी, मन्नू रामचंदानी, साई पक्षाचे टोणी सिरवानी, रिपाइंचे पदाधिकारी सहभागी झाले होते.