शरद पवार-अजित पवार सत्तासंघर्षात उल्हासनगरातील कलानी कुटुंब नॉट रिचेबल
By सदानंद नाईक | Published: July 3, 2023 04:50 PM2023-07-03T16:50:34+5:302023-07-03T16:51:17+5:30
माजी आमदार पप्पु कलानी यांच्यासह शहरजिल्हाध्यक्ष पंचम कलानी संपर्काबाहेर उल्हासनगरातील कलानी कुटुंब कोणाकडे?
उल्हासनगर - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार पप्पु कलानी यांच्यासह शहर जिल्हाध्यक्षा पंचम कलानी, युवानेते ओमी कलानी आदीजन संपर्का बाहेर असल्याने, कलानीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीतील गंगोत्री गटाने मात्र अजित पवार सोबत असल्याचे रविवारी स्पष्ट केले.
उल्हासनगरातील राजकारण गेल्या तीन दशका पेक्षा जास्त काळ माजी आमदार पप्पु कलानी यांच्या भोवती फिरत आहे. कलानी कट्टर शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. तर त्यांच्या दिवंगत धर्मपत्नी ज्योती कलानी ह्या राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर आमदार पदी निवडून आल्या होत्या. तसेच त्या अनेक वर्षे पक्षाच्या जिल्हाध्यक्षा राहिल्या आहेत. तर सद्यस्थितीत पक्षाच्या जिल्हाध्यक्षा पंचम कलानी आहेत. माजी आमदार पप्पु कलानी, पंचम कलानी, युवानेते ओमी कलानी यांच्यासह शहर कार्यकारणीतील अनेक पदाधिकारी संपर्काबाहेर असून इतरांनी राजकीय घडामोडी बाबत बोलण्यास नकार दिला.
रविवारी भारत गंगोत्री गटाने मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री यांची शपथ घेताच फटाक्यांची आतिषबाजी करून अजित पवार यांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया भारत गंगोत्री यांनी दिली. गंगोत्री यांनी समर्थकासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रविवारी रात्री भेट घेतली.
माजी आमदार पप्पु कलानी यांचे कट्टर समर्थक व राष्ट्रवादी जिल्हाकार्यकरणीचे पदाधिकारी कमलेश निकम यांनी कलानी कुटुंब लवकरच आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे कलानी नोटरिचेबल झाल्याने, त्यांच्या भूमिकेबाबत सर्वांचे लक्ष लागले. कलानी कुटुंब हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक असून पवार यांच्या सोबत राहणार असल्याचे कलानी समर्थकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे कलानी कुटुंब हे अजित पवार यांच्या सोबत गेल्यास, उल्हासनगर विधानसभा मतदारसंघासह महापालिका सत्तेवर कलानी कुटुंब दावा सांगणार आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गट व भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या पदाधिकाऱ्याची राजकीय कोंडी होणार असल्याचे शिंदे गट व आयलानी यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
कलानी महलमध्ये शुकशुकाट
शहरातील राजकारण नेहमी कलानी कुटुंबा भोवती फिरत राहिले असून सत्तेसाठी कलानी महलच्या पायऱ्या प्रमुख पक्ष नेत्यांनी चडल्या आहेत. मात्र रविवारच्या राजकीय घडामोडीनंतर कलानी नोटरिचेबल झाल्याने, कलानी महलवर शुकशुकाट झाला आहे.