उल्हासनगर : महापालिकासह उल्हासनगर विधानसभा व कल्याण लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व ठेवण्यासाठी भाजपसह शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी लोणावळ्यात कलानी कुटुंबासह बंद दरवाजा आड बैठक घेतल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या चर्चे बाबत शिवसेना शिंदे गटाने कानावर हात ठेवले तर आमदार कुमार आयलानी यांनी कलानी प्रवेशाला खुला विरोध केला आहे. उल्हासनगरात कलानी कुटुंबाचा दबदबा असून कलानी कुटुंब ज्या पक्षाच्या बाजूने उभे राहनार आहे. त्यांची महापालिकेवर सत्ता येणार असल्याचे बोलले जाते.
तसेच उल्हासनगर विधानसभेसह अंबरनाथ व कल्याण पूर्व मतदारसंघात कलानी यांचे वर्चस्व आहे. या तिन्ही मतदारसंघात सिंधी समाजसह कलानी यांना मानणारा मोठा समूह आहे. भविष्यातील ही रणनीती ओळखून भाजपसह शिवसेना शिंदे गटाने पप्पु कलानी व ओमी कलानी यांच्या सोबत गेल्या आठवड्यात बैठक घेतल्याचे बोलले जात आहे. याबाबत आमदार कुमार आयलानी यांच्यासी संपर्क केला असता, त्यांनी अशी कोणतीच बैठक झाली नसल्याचे सांगून, कलानी प्रवेशाला उघड विरोध केला. तर शिवसेना शिंदे गटाचे उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी याचर्चेला पूर्णविराम देऊन अशी बैठक झाली नसल्याचें सांगितले. राष्ट्रवादीमय झालेले ओमी कलानी यांच्याशी याबाबत संपर्क केला असता, त्यांचा मोबाईल बंद होता. त्यानंतर त्यांचे विश्वासू व पक्ष प्रवक्ता कमलेश निकम यांच्या सोबत संपर्क केला असता, त्यांनी लोणावळ्यात अशी बैठक झाली नसल्याचे सांगितले. शिंदे व भाजप गटाकडून बैठकी बाबत नकार घंटा दिला जात असलेतरी, शहरातील कुजबूजी नंतर काहीतरी घडले असावे. असे बोलले जात आहे. दरम्यान ओमी कलानी यांचा मंगळवारी वाढदिवास साजरा झाला असून ओमी कलानी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजप व शिवसेना शिंदे गटात चढाओड लागल्याचे चित्र होते. गेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी ओमी कलानी टीम समर्थक भाजप मध्ये गेल्यानेच, भाजपचा पहिला महापौर पदी निवडून आला होता. चौकट राष्ट्रवादीने सर्वकाही दिले...कमलेश निकम माजी आमदार पप्पु कलानी, ओमी कलानी, राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष पंचम कलानी यांनी पक्ष जनमानसात रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. मात्र सत्तेसाठी कलानी कुटुंब भाजप व शिंदे गटात जाणार नसल्याची माहिती पक्ष प्रवक्ता कमलेश निकम यांनी दिली.