ठाणे: उत्कर्ष इव्हेंटस् ॲन्ड प्रोडक्शन आणि कल्लाकार्स आयोजित ‘‘कलारसिक करंडक’’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा महाअंतिम सोहळा सोमवार ११ डिसेंबर रोजी गडकरी रंगायतन ठाणे येथे साजरा होणार आहे. या महाअंतिम सोहळ्यात एकूण ८ एकांकिका सादर होणार आहेत अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यात काक्षी, फ्लाईंग राणी, मेन इन ब्लॅक, कृष्णपक्ष, खुदीराम, पुंडलिका भेटी, हॅलो इन्स्पेक्टर आणि लोकल पार्लर अशा दर्जेदार एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. याची प्राथमिक फेरी ठाणे-मुंबई, नाशिक आणि पुणे येथे पार पडली. पहिल्याच वर्षी एकूण ३१ संघांनी यात सहभाग दर्शवला. प्राथमिक फेरीचे परीक्षण राम दौंड, रमेश रोकडे, सुहास भोसले, अन्वय बेंद्रे, माधव जोगळेकर यांनी केले.
या ‘कलारसिक करंडक’ चे वैशिष्ट्य म्हणजे ‘माझे गुणपत्रक माझा हक्क’ या माध्यमातून सर्व संघांना त्यांचे गुणपत्रक प्राथमिक फेरीनंतर पाठवले गेले. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासठी अनुक्रमे ५० हजार, ३० हजार आणि २० हजार तसेच, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
या स्पर्धेला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणू सुप्रसिद्ध अभिनेते अंशुमन विचारे आहेत. या स्पर्धेचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे यात दोन लक्षवेधी पुरस्कार देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट तांत्रिक एकांकिका सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक स्व. नितिन चंद्रकांत देसाई पुरस्कार आणि उत्कृष्ट विनोदी एकांकिका सुप्रसिद्ध अभिनेते प्रदिप पटवर्धन पुरस्कार. या पत्रकार परिषदेला प्रदिप गोगटे, यज्ञेश दौंड, जान्हवी अस्लेकर आदीउपस्थित होते. कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे. या स्पर्धेचा ‘पारितोषिक वितरण समारंभ’ त्याच दिवशी होणार असून याचे सूत्रसंचालन प्राजक्ता आपटे करणार आहेत.