लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ला हा केवळ त्यांच्यावर नसून तो महापालिकेवर हल्ला असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमुद केले. स्टेशन परिसरात बदली मिळावी म्हणून काही कंत्रटी कर्मचारी हटट् धरत आहेत, फेरीवाल्यांच्या पे रोलवरच हे कर्मचारी काम करीत असल्याचा आरोप म्हस्के यांनी केला. तर शहरात केवळ २५० फेरीवाल्यांकडेच १५ वर्षे वास्तव्याचा दाखला असून उर्वरीत ९९ टक्के फेरीवाले हे बाहेरचे असल्याचा दावाही त्यांनी केला. पिपंळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालविण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला. त्यासाठी विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करावी असेही यावेळी नमुद करण्यात आले.
पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्यानंतर महापौर म्हस्के यांनी काही प्रमुख मुद्यांना हात घालून प्रशासनावर टिकेची झोड उठविली. कर्मचाऱ्यांना नौपाडा, स्टेशन रोड हा भाग हवा असता, त्याच ठिकाणी बदलीसाठी हटट धरला जातो. एका एका विभागात काही ठराविक अधिकारी, प्रभाग समितीमध्ये तोच तोच स्टाफ का ठेवला जात आहे, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. पिपंळेवर हल्ला झाला, त्यावेळेस इतर कर्मचारी लांब का उभे होते, याची चौकशी ही झालीच पहिजे, पदपथ हे फेरीवाला मुक्त केले जावेत, पदपथावर असलेले इतर स्टॉल व नव्याने काही पक्षांची कार्यालये उभारली जात असतील तर त्यावर देखील कारवाई करावी, स्टेशन, नौपाडा परिसरात कायम फेरीवाले असतात त्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई झालीच पाहिजे, नगरसेवक काही तक्रारी करीत असतील तर करु द्या त्यावर कारवाई करावीच असेही त्यांनी स्पष्ट केले. शहराच्या विविध भागात खाद्यांच्या गाडय़ा लागलेल्या असतात, त्यांना सलग १० दिवस जामर लावून ठेवा, त्याचे नुकसान झाल्यावर तो गाडी लावणार नाही, असा सल्लाही त्यांनी दिला. ताबा पावतीतही मोठा स्कम असल्याचा दावाही त्यांनी केला. त्याचे पुरावे देखील त्यांनी सभागृहात सादर केले. हल्ला झाल्यास त्यासाठी विमा काढणो गरेजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.