ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्यापेक्षा आघाडी करून लढण्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकमत झाले असून त्यानुसार प्राथमिक बैठकदेखील पार पडली आहे. दुसरीकडे पुढील बैठक गुरुवारी पार पडणार आहे. परंतु, आता कळवा, मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढतीच्या मुद्यावरून या आघाडीत बिब्बा होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आघाडी करायची तर संपूर्ण शहरासाठी करा, नाही तर मैत्रीपूर्ण लढत नको, असा सूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आळवला आहे. त्यामुळे आता या आघाडीत बिघाडीची चिन्हे निर्माण होण्याची शक्यता आहे.पुढील महिन्यात ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये आघाडी होणार आहे. त्यानुसार, जागावाटप आणि इतर पुढील चर्चेविषयीची बैठक १२ जानेवारीला आयोजिली आहे. ही आघाडी होत असताना कळवा, मुंब्य्रातही आघाडी करा, असा सूर काँग्रेसने लावला आहे. मागील निवडणुकीतदेखील राष्ट्रवादीने अशा प्रकारे या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती केल्याने त्याचा अधिकचा फटका काँग्रेसलाच बसल्याचे मत पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले आहे. ज्या ठिकाणी आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो, त्या ठिकाणी राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाणीवपूर्वक उभे केले होते. आता हीच पद्धत राष्ट्रवादीकडून पुन्हा वापरली जाणार असून केवळ काँग्रेसचा मतांसाठीच वापर करण्याचाच प्रयत्न केला जाणार असल्याचेही आता बोलले जात आहे. त्यातही ठाण्यात आघाडी आणि कळवा, मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढत, असा प्रस्ताव राष्ट्रवादीनेच आमच्यापुढे ठेवला आहे. त्यामुळे त्याबाबत काय करायचे, हे आता आम्ही ठरवणार आहोत, असेही काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादी जर कळवा, मुंब्य्रातच मैत्रीपूर्ण म्हणत नसून शहरातील राबोडी किंबहुना शहराच्या ज्या भागात त्यांचे वर्चस्व आहे, त्या ठिकाणीदेखील ते स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. त्यातही मागील निवडणुकीच्या वेळेस अनेक वचने राष्ट्रवादीने दिली होती. परंतु, ती पूर्ण केली नाहीत, याची जाणीवही आता काँग्रेस त्यांना या बैठकीच्या निमित्ताने करून देणार आहे.(प्रतिनिधी)
कळवा-मुंब्य्रातील मैत्रीपूर्ण लढतीमुळे आघाडीत बिघाडी?
By admin | Published: January 10, 2017 6:37 AM