ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आठवड्यात २३ तर सोमवारी ४ रुग्ण दगवाल्यानंतर मंगळवारी त्याता आणखी दोघांची भर पडली होती. परंतु सुदैवाने बुधवारी एकाही मृत्युची नोंद झाली नसल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे. रुग्णालय प्रशासनाला त्याला दुजोरा देण्यात आला आहे.
मागील आठवड्यात गुरुवारी पाच आणि त्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत १८ मृत्युंची नोंद झाल्यानंतर कळवा रुग्णलायाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला होता. या मृत्युनंतर सर्वच राजकीय पक्षांनी रुग्णालय प्रशासनाला धारेधर धरले होते. तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती देखील नेमण्यात आली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रुग्णालयात धाव घेऊन या ठिकाणच्या कामकाजाची पाहणी केली. तसेच २५ ऑगस्टपर्यंत अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
दरम्यान सोमवारी पुन्हा चार आणि मंगळवारी दोन रुग्णांचा मृत्यु झाला होता. त्यामुळे कळवा रुग्णालयातील मृत्युचे तांडव काही थांबतांना दिसत नसल्याचे दिसून आले. परंतु मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर रुग्णालय प्रशासन जागे झाले आहे. तसेच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी देखील १५ आॅगस्ट रोजी २ तास मॅरेथान बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अनेक महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. तसेच वैद्यकिय अधिष्ठता आणि वैद्यकीय अधिक्षक यांचे कारकुनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच येत्या काही दिवसात वाढीव कुमकही भरती केली जाणार आहे. त्यातही रुग्णांशी सौजन्याने वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. मुबलक औषध साठा उपलब्ध ठेवण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.
एकूणच आता कसाबसा का होईना रुग्णालयाचा कारभार सुधारतांना दिसत आहे. परंतु सलग आलेल्या सुट्यांमुळे रुग्णालयात ऑपेरशन सेवा बंद असून ओपीडी देखील दोन दिवस बंद होती. त्यामुळे रुग्णालयावरील ताण दोन दिवस कमी झाल्याचे दिसून आले आहे. परंतु आता गुरुवारी पुन्हा ताण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असेल तरी मागील काही दिवस सुरु असलेले मृत्युचे थैमान बुधवारी थांबल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले आहे.