ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यु तांडवानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. त्यानुसार त्याचा अहवाल २५ ऑगस्ट रोजी येणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही चौकशी समितीचे काम पूर्ण न झाल्याने त्यांनी आता मुदतवाढ मागितली असल्याची माहिती समोर आली आहे. अद्यापही काही डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी, प्रशासकीय कामकाज विभागातील कर्मचाºयांची चौकशी पूर्ण झाली नाही. त्यासाठी साधारपणे १० ते १२ दिवसांचा कालावधी जाऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल लांबला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्ट रोजी पाच जणांचा तर, रविवार १३ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी अवघ्या १२ तासात १८ रुग्ण दगावले होते. या सर्व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ९ जणांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मागील आठवड्यात या समितीमधील प्रमुखांनी गुरुवार १७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास महापालिका मुख्यालयात हजेरी लावली होती. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात या समितीची बैठक घेतली. यावेळी समितीने पहिल्याच दिवशी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित करीत, महत्वाची कागद पत्रे ताब्यात घेण्यात आली होती.
दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देखील कळवा रुग्णालयात जावून तेथील परस्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे २५ ऑगस्ट पर्यंत समिती अहवाल सादर करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, अजूनही डॉक्टर्स, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी आणि प्रशासकीय कामकाज (अडमीन) विभागातील कर्मचाऱ्यांची देखील चौकशी पूर्ण झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या सर्वांच्या चौकशीसाठी आणखी १० ते १२ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या चौकशीनंतर अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे चौकशी अहवालासाठी अजून काही दिवस वाट पहावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.