ठाणे : कळवा रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल दीड महिना उलटूनही अद्यापही पुढे आलेला नाही. चौकशी समितीने चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. मात्र, राज्य सरकारने अद्यापही अहवाल उघड केला नाही. त्यामुळे अहवालात नेमके काय दडलंय, कोणासाठी हा अहवाल लांबविला जात आहे? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दि. २५ ऑगस्टपर्यंत अहवाल येणे अपेक्षित होते. परंतु, या अहवालालादेखील आता ‘तारीख पे तारीख’ पडत आहे.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दि. १० ऑगस्टला सहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दि. १३
ऑगस्टला तब्बल १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावरच टीका झाली होती.
या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार चौकशी समिती स्थापन झाली. त्यांनी लागलीच कळवा रुग्णालयाची झाडाझडतीदेखील घेतली. डॉक्टरांसह येथील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली.
अलीकडेच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी चौकशी अहवालातून योग्य तो निर्णय पुढे येईल, तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहवालाला उशीर होत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुन्हा केंद्र सरकारच्या एका कार्यक्रमात आरोग्य यंत्रणा व्यस्त झाली आणि पुन्हा अहवाल लांबला.
आता चौकशी समितीने चौकशी पूर्ण करून, राज्य सरकारकडे अहवाल सादर केला आहे. परंतु, अहवाल उघड करण्यासाठी राज्य सरकारलाच वेळ नसल्याची माहिती समोर आली आहे.
या अहवालात नेमके काय आहे, कोणावर ठपका ठेवला, याबाबत पालिकेचे अधिकारीही काहीच बोलायला तयार नाहीत. त्यामुळे कारवाई होणार की अहवाल गुलदस्त्यातच राहणार? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
कळवा रुग्णालयात कोणकोणत्या सुविधा आहेत? कोणत्या असुविधा आहेत, याचीदेखील माहिती त्यांनी घेतली. एक आठवडा त्यांच्याकडून चौकशीचा ससेमिरा सुरू होता. त्यानंतर अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. २५ ऑगस्टपर्यंत अहवाल येणे अपेक्षित होते. परंतु, या अहवालालादेखील आता ‘तारीख पे तारीख’ पडत आहे.