लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यूंची चौकशी करण्याकरिता नियुक्त केलेल्या नऊ जणांच्या समितीने चौकशीस मुदतवाढ मागितली आहे. समितीला आणखी १० ते १२ दिवस लागतील, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समितीची नियुक्ती केली तेव्हा २५ ऑगस्टपर्यंत अहवाल देण्याची मुदत दिली होती.
कळवा रुग्णालयातील काही डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी, प्रशासकीय कामकाज विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यासाठी साधारपणे १० ते १२ दिवसांचा कालावधी जाऊ शकतो, असे सांगण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्ट रोजी पाच जणांचा तर, रविवार १३ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी अवघ्या १२ तासात १८ रुग्ण दगावले होते.
पहिल्याच दिवशी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित
मागील आठवड्यात या समितीच्या प्रमुखांनी गुरुवार १७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास महापालिका मुख्यालयात हजेरी लावली होती. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात या समितीची बैठक घेतली. यावेळी समितीने पहिल्याच दिवशी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करीत, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात झाली होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कळवा रुग्णालयात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.