- मुरलीधर भवार
कल्याण - बेकायदा नळ कनेक्शन घेऊन सर्व्हीस सेंटर चालविणाऱ्यांचे पाणी कनेक्शन एमआयडीसने कट करण्याची कारवाई काल केली. एमआयडीच्या धडक कारवाई पाठाेपाठ कल्याण डाेंबिवली महापालिका अॅक्शन माेडमध्ये आली आहे. महापालिकेने सगळ्याच प्रभागात बेकायदा नळ जाेडण्या कट करण्याची धडक कारवाई केली आहे. महापालिकेच्या कारवाई पथकाने आत्तापर्यंत १३३ बेकायदा नळ कनेक्शन कट केले आहेत.
चार दिवसापूर्वी उद्यागे मंत्री उदय सामंत यांच्या समवेत मंत्रालयात कल्याण डाेंबिवलीतील २७ गावांमधील पाणी प्रश्नावर बैठक पार पडली. या बैठकीस कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यासह २७ गावातील पदाधिकारी उपस्थित होते. २७ गावात सुरु असलेल्या बेकायदा बांधकामांना चाेरुन पाणी पुरवठा केला जाताे. त्यामुळे अधिकृत कर भरणा करणाऱ्या नागरीकांना पाणी मिळत नाही. २७ गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात आहे. पुरेसा पाणी पुरवठा केला जाताे. मात्र नागरीकांच्या ताेंडचे पाणी बेकायदा बांधकाम धारक आणि टॅंकर माफिया फलवितात. शीळ येथील एका इमारतीला एका टॅंकर चालकाने पाणी पुरविण्यासाठी जास्तीचे बिल आकारले. टॅंकर मागविण्यात साेसायटीचे एक काेटी पेक्षा जास्त रुपये खर्च झाले आहे.
२७ गावांना ४० दश लक्ष लीटर पाणी पुरवठा मंजूर आहे. या गावांना पाणी पुरवठा याेग्य प्रकारे वितरीत हाेताे की नाही हे पाहण्यासाठी एक समिती देखील नेमण्याचे आदेश उद्याेगमंत्र्यांनी या बैठकीत दिले. त्यानंतर त्यांनी पाणी चाेरांना पकडण्याकरीता स्वतः डाेंबिवलीनजीकच्या भाेपर परिसरात धाड टाकली. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीने बेकायदा नळ जाेडणी घेऊन पाणी चाेरणाऱ्या सर्व्हीस सेंटरचे कनेक्शन कट केले. त्या पाठाेपाठ महापालिकेने १३३ बेकायदा नळ कनेक्शन कट करण्यात आले आहेत.
आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशानुसार बल्याणी परिसरातील १७, उंबर्डे परिसरातील पाच, देवानंद भाेईर चाळीतील २१, वालधूनी परिसरातील १३, काटेमानिवली परिसरातील ५, खंबाळपाडा परिसरातील १२, डाेंबिवली ह प्रभागातील १५, नेरुरकर राेड, म्हात्रेनगर, आयरेगाव या परिसरातील १२, गाेळवली आणि पिसवली परिसरातील २२, आय प्रभागातील १४, नांदिवली, भाेपर, देसलेपाडा परिसरातील ६ बेकायदा नळ कनेक्शन कट करण्यात आली आहेत. ही कारवाई कार्यकारी अभियंता प्रमाेद माेरे आणि किरण वाघमारे यांनी केली आहे. बेकायदा नळ कनेक्शन घेऊन पाणी चाेरी करणाऱ्यांच्या विराेधात पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल करणयात आले आहे. कनेक्शन कट करण्यात आलेल्यांमध्ये १४ वाणिज्य आस्थापनांचा समावेश आहे. ही कारवाई पुढेही सुरुच राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.