- मुरलीधर भवार
कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेने ५ ते १२ जानेवारी या कालावधीत डीप क्लिनिंग मोहिम राबविली. या मोहिमेमुळे शहरातून २६१ मेट्रीक टन कचरा गोळा करण्यात आला. ही मोहिम टप्प्या टप्प्याने सर्व प्रभाग क्षेत्रात राबविली जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिका हद्दीत डीप क्लिनिंग मोहिम सुरु करण्यात आली. ही मोहिम राज्यभरात राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या या मोहिमेचा शुभारंभ ५ जानेवारी रोजी महापालिकेच्या आय प्रभागातून करण्यात आला. ५ ते १२ जानेवारी दरम्यान ही मोहीम आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांच्या आदेशानुसार विविध प्रभागात राबविली गेली. आज ही मोहिम फ प्रभागात राबविली गेली. गणेश मंदिर संस्थान परिसरासह १० मुख्य रस्ते स्वच्छ करण्यात आले. २०० कंत्राटी कामगारांच्या मदतीने फूटपाथ, दुभाजक तीन ३ टँकरद्वारे पाण्याने स्वच्छ धुवून घेण्यात आले.
कचरा संकलन आणि वाहतूक यंत्रणा, पाण्याचे टँकर आणि विशेष करून २ धूळ शमन वाहने यांचा वापर करण्यात आला. या मोहिमेत माजी नगरसेवक मंदार हळबे, राहूल दामले, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अतुल पाटील यांच्यासह गणेश मंदिर संस्थानचे सचिव प्रवीण दुधे, विवेकानंद फाऊंडेशनचे अनिल मोकल, उर्जा फाऊंडेशनच्या मेधा गोखले, श्रीलक्ष्मी नारायण संस्थेच्या सुरेखा जोशी आदींनी सक्रीय सहभाग घेतला.