कल्याण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त कल्याणात तब्बल 75 फुटी भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे 12 युवा कलाकारांनी न थांबता सलग 16 तास अथक मेहनत घेऊन या रांगोळीत प्राण फुंकले आहेत.बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांची रेलचेल असताना रोहीत बाळाराम जाधव यांच्या बी.जे. ग्रुपने या सांस्कृतिक उपक्रमाद्वारे त्यांना मानवंदना दिली आहे. कल्याण पश्चिमेच्या फडके मैदानात रेखाटण्यात आलेल्या या रांगोळीने आतापर्यंतच्या सर्वात भव्य रांगोळीचा मान मिळवला आहे. रांगोळीच्या एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य चित्र रेखाटण्यात आले आहे. तब्बल 400 किलो रांगोळीचा त्यासाठी वापर करण्यात आल्याची माहिती रांगोळी रेखाटणाऱ्या कलाविश्व संस्थेच्या शाम आडकर यांनी दिली.शाम यांच्यासह विशाल सावंत, शैलेश कुलकर्णी, नरेंद्र आंबेडकर, रोहित नारकर, निखिल पवार, श्रद्धा साखळकर, वेदांती शिंदे, अक्षता खेडकर,अक्षता तावडे आणि सविता आवटे या 12 कलाकारांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता या कलाकारांनी ही रांगोळी काढण्यास सुरुवात केली. जी पूर्ण होण्यास सकाळचे 11 वाजले. कल्याणात पहिल्यांदाच साकारण्यात आलेली ही भव्य रांगोळी पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे.
कल्याण- बाबासाहेब आंबेडकरांची 75 फुटी रांगोळी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 1:08 PM