कल्याण- भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांची पत्नी पल्लवी पाटील यांना भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांच्या समर्थकांनी भर रस्त्यात रिव्हॉल्वरचा धाक दाखवून धमकाविल्याचा आरोप पल्लवी पाटील यांनी केला आहे. कुणाल पाटील यांनी पल्लवी यांनी केलेला आरोप फेटाळून लावला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच भाजपा नगरसेवक महेश पाटील हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावर भाजपा नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप आहे. सदर प्रकरणाचा तपास सुरु असताना महेश पाटील यांची पत्नी पल्लवी यांनी कुणाल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्याने पुन्हा एकदा महेश पाटील व कुणाल पाटील यांच्या वैमनस्य उफाळून आलं आहे. पल्लवी यांचा आरोप आहे की, ती त्यांच्या एका मैत्रीणीसोबत कार्यक्रमास गेली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्याची दोन मुलेही होती. रस्त्यावरुन पल्लवी यांची गाडी जात असाताना त्याच रस्त्याने कुणाल पाटील यांच्या गाडय़ांचा ताफा चालला होता. त्यापैकी एका गाडीतून काही लोकांनी पल्लवीला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पल्लवी यांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी भाजपाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्यने पोलिस ठाण्याच्या आवारात जमले. तब्बल दोन तास भाजपच्या कार्यकर्त्यांना गोंधळ सुरु होता. पल्लवी यांना धमकाविल्या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात इमसांच्या विरेाधात गुन्हा दाखल झाला आहे. पल्लवी यांच्या तक्रारीची सखोल चौकशी करण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. तसेच भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांनी पल्लवी यांनी केलेला आरोप हा बिनबुडाचा आहे. या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. अशा प्रकारचा तक्रार पोलीस ठाण्यात देऊन पल्लवी यांनी माझ्यासह माझ्या कुटुंबियांची बदनामी करण्याचा कट रचला आहे. चौकशीपश्चात पल्लवी यांची तक्रार खोटी निघाल्यास या प्रकरणी पल्लवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं धाडस पोलिसांनी करावं, असं कुणाल पाटील यांनी म्हंटलं आहे.