उल्हासनगर : शहरातील कल्याण-अंबरनाथ रस्ता रुंदीकरणातील पूर्णतः बाधित झालेल्या दुकानदारांना पर्यायी जागा मिळण्याची शक्यता भाजपने पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली. तर पूर्णतः बाधित झालेल्या दुकानदारांची मालकीहक्कांचे पुरावे तपासून निर्णय घेणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.
उल्हासनगर मधून जाणाऱ्या कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण सन २०१५ साली तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी केले. रस्ता रुंदीकरणाचा तब्बल ८५० पेक्षा जास्त दुकाने व घरे अंशतः व पूर्णतः बाधित झाले. अंशतः बाधित दुकानदारांनी त्याच जागेवर बहुमजली बांधकामे केली. तर पूर्णतः बाधित दुकानदारांना कॅम्प नं-३ येथील इंदिरा गांधी भाजी मार्केट येथे २०० फुटाचे दुकान देण्याचा ठराव त्यावेळी महासभेत मंजूर करण्यात आला होता. मात्र त्यावर अध्यापही तोडगा निघाला नाही. महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुका जवळ आल्यावर रस्ता रुंदीकरणातील बाधित दुकानदारांना पर्यायी जागा देण्याचा विषय राजकीय नेत्यांकडून तापविला जातो. मात्र नंतर यामधून काहीएक साध्य होत नाही. असा व्यापारी व नागरिकांचे म्हणणे आहे. शासन व महापालिकेच्या धडसोड धोरणामुळे रस्ता रुंदीकरणात पूर्णतः बाधित झालेले बहुतांश व्यापारी देशोधडीला लागल्याची टीका होत आहे.
भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी व व्यापारी संघटना यांच्या वतीने पुन्हा रस्ता रुंदीकरणाचा बाधित झालेल्या ८० व्यापार्यांना पर्यायी जागा मिळण्याचे संकेत दिले आहे. विधानसभासत्र सुरू असल्याने, याबाबत वरिष्टस्तरावर हालचाली सुरू झाल्याचे रामचंदानी यांनी सांगितले. रस्ता रुंदीकरणातील बाधित ४ व्यापाऱ्यांचे जागेबाबत मालकीहक्क तपासून पर्यायी जागा महापालिकेने यापूर्वीच दिल्या आहेत. अशी माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. भाजपने दिलेल्या बाधित ८० व्यापाऱ्यांच्या जागेची मालकी हक्क तपासून याबाबत महापालिका निर्णय घेणार असल्याचे संकेत उपायुक्त नाईकवाडे यांनी दिले. तर दुसरीकडे महापालिकेकडे पर्यायी जागा देण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याची माहिती त्यांनी दिल्याने, नेहमीप्रमाणे ८० बाधित दुकानदारांचा प्रश्न टांगलेला राहणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.