कल्याण / म्हारळ : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेला प्रत्येकी सहा जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन, मनसेला एक जागा मिळाली आहे. तर, एक अपक्ष शिवसेनेच्या बाजूने आहे. या निवडणुकीकरिता शिवसेना-भाजपाची युती जागेच्या वादातून फिसकटली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपाला साथ दिली. तर, शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवताना अपक्ष आणि बिनविरोध आलेल्या उमेदवारासह आठ जागा मिळवल्या. भाजपा, राष्ट्रवादी आणि मनसे मिळून भाजपाकडे १० जागांचे संख्याबळ असून, ते सत्ता स्थापनेसाठी पुरेसे आहे. त्यामुळे बाजार समितीवर भाजपाचा झेंडा फडकणार आहे, हे सोमवारी लागलेल्या निकालावरून स्पष्ट होत आहे.बाजार समितीच्या नव्या नियमानुसार, १८ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. दोन जागा बिनविरोध निवडून आल्याने १७ मार्चला १६ जागांसाठी मतदान झाले. परंतु, बाराव्या गणातील मतपत्रिका जळाल्याने या गणासाठी रविवार, २४ मार्चला फेरमतदान झाले. त्यानंतर, सोमवारी बाजार समितीच्या आवारात मतमोजणी झाली. त्यात भाजपातर्फे दत्ता गायकवाड (कल्याण), मधुकर मोहपे (रायते), रवींद्र घोडविंदे (कुंदे), विद्या पाटील (खडवली), किसन धुमाळ (मांडा), श्रीपत भोईर (गोवेली) निवडून आले. राष्ट्रवादीतर्फे अर्जुन चौधरी (निळजे), शंकरराव आव्हाड (राष्ट्रवादी), अरुण जाधव (वावेघर), मनसेतर्फे गजानन पाटील (नांदिवली-पंचानंद), तर शिवसेनेतर्फे मयूर पाटील (बल्याणी), कपिल थळे (बारावे), शाहीद मुल्ला (वाहोली), भूषण जाधव (फळेगाव), जयश्री तरे (टिटवाळा), मंगल म्हस्के (अहिरे), मोहन नाईक (व्यापारी अडते), धोंडीभाऊ पोखरकर (व्यापारी अडते) हे विजयी झाले. १८ जागांपैकी १६ व्यापारी, अडतेची एक जागा व हमाल मापाडीच्या दोन जागा सोडल्या, तर उर्वरित १५ जागा या शेतकरीवर्गाच्या होत्या. निवडून आलेल्या १८ जागांपैकी राष्ट्रवादीचे अरुण जाधव व शिवसेनेचे मंगल म्हस्के हे बिनविरोध निवडून आले आहेत.मतपत्रिका जळाल्याने फेरनिवडणूक झालेल्या बाराव्या गणातही भाजपाच- बाजार समितीचे मतदान १७ मार्चला झाले. सायंकाळी मतपेट्या बाजार समिती मुख्यालयाच्या आवारात आल्या असताना बाराव्या गणातील मतपेटीतून धूर निघाला. तेव्हा मतपेटी कामगारांनी उघडली. त्यात मतपत्रिका जळत असल्याचे दिसून आले.त्यामुळे १८ मार्चची मतमोजणी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगित केली. या गणात २४ मार्चला फेरनिवडणूक झाली. तेथे भाजपाचे दत्तात्रेय गायकवाड हे विजयी झाले. राष्ट्रवादीचे भीमराव पाटील यांचा त्यांनी दारुण पराभव केला.फेरमतदानाची मागणी करणाऱ्या पाटील यांनी त्यांचा विजय रोखण्यासाठी मतपत्रिका जाळण्याचा आरोप केला होता. मात्र, त्यांच्या पराभवानंतर त्यांच्या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे उघड झाले आहे.
कल्याण एपीएमसीत फुलले कमळ; राष्ट्रवादी निर्णायक भूमिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:56 PM