- सचिन सागरे कल्याण : राहुल गिरीगोस्वामी विहिरीत पडल्याचे कळताच त्याला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारणार होतो. पण, दुसऱ्या मित्राने तसे करण्यापासून रोखल्याचे राहुलचा मित्र विजय गायकवाड याने सांगितले.गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास भीमाशंकर मंदिराजवळ विजय गायकवाड, नितीन भानुशाली आणि त्यांचे मित्र गप्पा मारत बसले होते. यावेळी अचानक समोरील विहिरीजवळून आवाज आला. आवाजाच्या दिशेने हे सर्वजण पळाले. तेव्हा राहुल आणि त्याचे वडील विहिरीत पडल्याचे विजयला समजले. पोहता येत असल्याने त्यांना वाचवण्यासाठी स्वत: विजय विहिरीत उडी मारणार होता. पण, याचवेळी नितीनने त्याला तसे करण्यापासून अडवले. नितीनने घडलेली घटना सांगण्यासाठी दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी पोलिसांना फोन केला. मात्र, त्यावर कोणतीही प्रतिक्रिया त्यांना मिळाली नाही.विहिरीत वीजप्रवाह गेल्याने या तिघांना विजेचा धक्का लागल्याची शक्यता वाटल्याने नितीनने महावितरण कंपनीला याबाबतची माहिती कळवली. त्यामुळे त्यांनी या परिसराचा विद्युतपुरवठा त्वरित बंद केला. याचदरम्यान, नितीनने घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी २० ते २५ मिनिटांत पोहोचले. अग्निशमन दलाचे जवान प्रमोद वाघचौरे आणि अनंत शेलार हे घटनास्थळी आल्यावर नितीनने त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यानुसार, शेलार आणि वाघचौरे हे पाठोपाठ विहिरीत उतरले आणि पुढील दुर्दैवी घटना घडली.
कल्याण विहीर दुर्घटना: '...अन् डोळ्यांदेखत आमचा मित्र गेला'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 12:12 AM