डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने गुरुवारी काहीशी उसंत घेतली तरी अचानक खाडीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची तारांबळ उडाली. ठाकुर्ली पूर्वेतील कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर खाडीचे पाणी आल्याने हा रस्ता पाणी ओसरेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्याचबरोबर येथील खंबाळपाडा-कांचनगाव परिसरातील दिनेशनगर भागात नाला ओसंडून वाहू लागल्याने येथील चाळीतील ३०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थितीमुळे रेल्वे समांतर रस्ता आणि ९० फुटी रस्ता जोडणाऱ्या म्हसोबा चौकात अडीच ते तीन फुटांपर्यंत खाडीचे पाणी शिरते. त्यामुळे समांतर रोड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होतो. उल्हास नदी आणि वालधुनी नदीच्या पातळीत गुरुवारी पहाटेपासूनच वाढ व्हायला सुरुवात झाली. यात कल्याण खाडीचेही पाणी वाढल्याने सकाळपासून खाडीचे पाणी समांतर रस्त्यावरही यायला सुरुवात झाली. प्रारंभीच्या काळात हे पाणी कमी होते, परंतु, सकाळी ११ नंतर पाण्याची पातळी अचानक वाढल्याने म्हसोबा चौक ते लक्ष्मी पार्कपर्यंतच्या रस्त्यावर तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले. दुपारी १२.४५ च्या सुमारास सुरू झालेल्या खाडीच्या भरतीमुळे पाणी आणखी वाढू लागल्याने अखेर हा रस्ता डोंबिवली वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला. येथील वाहतूक खंबाळपाडामार्गे वळविण्यासाठी पोलिसांना सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनच्या वाहतूक स्वयंसेवकांची विशेष मदत झाली. दरम्यान, पर्यायी मार्गाचे रस्ते हे अरुंद असल्याने येथे वाहतूककोंडी झाली.
आरबीटी हायस्कूलमध्ये व्यवस्था
केडीएमसीचे ‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकारी भरत पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत येथील परिस्थितीचा आढावा घेतला. ठाकुर्ली, कांचनगाव परिसरात दिनेशनगरमधील नाल्यातील पाण्याचा वाढता धोका पाहता ३०० नागरिकांचे आरबीटी हायस्कूल या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.
------------
-------------------------