कल्याण : प्लास्टिक पिशव्या बाळगल्याप्रकरणी एका महिला दुकानदाराला पोलीस असल्याची बतावणी करत तिच्याकडील ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना पूर्वेत घडली. याप्रकरणी तोतया पोलीस आणि त्याच्या साथीदाराविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पूर्वेतील शंकर पावशे रोड परिसरातील साईकुंज अपार्टमेंटमध्ये विंदू सिंह (५४) यांचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास त्या दुकानात बसल्या होत्या. त्यावेळी एक व्यक्ती रिक्षातून उतरत त्यांच्या दुकानात आली. त्याने विंदू यांच्याकडे खारी आणि बिस्किटांचे पुडे मागितले. तेव्हा या दोन्ही वस्तू विंदू यांनी प्लास्टिकच्या पिशवीत देऊ केल्या. यावेळी त्या व्यक्तीने आपण पोलीस असल्याचे सांगत प्लास्टिकबंदी असताना तुम्ही कसे वापरता, असा सवाल करत कारवाई करण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा ६३ हजारांचा मुद्देमाल घेऊन तेथून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे विंदू यांच्या लक्षात येताच त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी तोतया पोलीस आणि त्याचा साथीदार असलेल्या रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तोतया पोलिसाने महिलेला लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 6:52 AM