कल्याण - कल्याण-टिटवाळा येथील गोवेल चौकात शिवजयंतीनिमित्त राज ग्रुप संस्थेच्या वतीनं शिवाजी महाराजांचा बॅनर लावण्यात आला होता. हा बॅनर उल्हासनगरचे नगरसेवक राजेश वधारीया यांच्या माणसांनी काढला. यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. यानंतर राजे ग्रुपने वधारीया यांच्या कृत्याचा निषेध करत टिटवाळा बंद पुकाराला आहे. ''जिथे शिवजयंतीचा बॅनर लावला होता. ती जागा जाहिरातीसाठी वधारीया यांच्या जाहिरात कंपनीकडे आहे. वधारीया यांच्या विरोधात तक्रार प्राप्त झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल'', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अहमदनगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदमकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान
अहमदनगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने शुक्रवारी नगर शहरासह जिल्ह्यात प्रचंड जनक्षोभ उसळला होता. पोलिसांनी शुक्रवारी (16 फेब्रुवारी) रात्री ९ वाजता छिंदमला अटक केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तोफखाना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छिंदम याला शनिवारी सकाळी ८ वाजता न्यायालयात हजर केले. न्यायालयाने छिंदमला १ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. छिंदम याच्यावर सरकारी कामात अडथळा व धार्मिक भावना दुखवल्याचे तोफखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. के. एम. कोठुळे यांनी छिंदमच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. यावेळी छिंदम याच्या बाजुने युक्तीवाद करण्यासाठी कोणी वकिल नव्हता. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चांदगुडे यांनी त्याला न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. दरम्यान छिंदम याला सबजेलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे छिंदमला कैद्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. छिंदम याची लवकरच नगर बाहेर रवानगी होणार असल्याचे समजते.
दरम्यान, शनिवारी सकाळी 9 वाजता अहमदनगरच्या सबजेलमध्ये छिंदमला दाखल केल्यानंतर तेथील कैद्यांनी त्याच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी त्याला मारहाण झाल्याचीही चर्चा आहे. मात्र, कारागृह प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिलेला नसला तरी सबजेलमधून छिंदम याला हलविण्यात यावे, असे पत्र न्यायालयाला दिले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून छिंदम याला सबजेलमधून हलवावे, असे पत्र सबजेल प्रशासनाने न्यायालयाला दिले आहे. निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमला सुरक्षेच्या कारणास्तव येरवडा कारागृहात हलवणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.