गुन्ह्यांची मालिका थांबेना : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
स्टार 1065 (टेम्प्लेट) प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाच्या पहिल्या लाटेत लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये कल्याण-डोंबिवली शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण अत्यंत कमी होते. लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी वाढविलेल्या पोलिसांच्या गस्तीमुळे सर्वच गुन्ह्यांना पायबंद बसला होता; परंतु अनलॉक होताच पुन्हा गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या आणि वाहन चोरींच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. गुन्ह्यांची उकल करण्यात काही अंशी पोलिसांना यश येत असले तरी चोर-पोलिसांचा खेळ सुरूच आहे.
मागील वर्षभरात कल्याण-डोंबिवलीत बंद घरे व दुकानांचे शटर उचकटून मुद्देमाल लंपास करणे, सोनसाखळी चोरी, हातचलाखी, वाहनचोरी, मोबाइल चोरी, घरात घुसून मुद्देमाल लुटणे, हनी ट्रॅप, ऑनलाइन फसवणूक, हल्ला करून पैसे आणि मोबाइल लुबाडणे आदी प्रकार सातत्याने घडल्या आहेत. डिसेंबरमध्ये एका जवाहिराच्या दुकानात भरदिवसा शस्त्राच्या धाकाने चोरीचा प्रकार घडला होता. तर आडीवलीत तीन दिवसांत ११ घरफोड्या झाल्या होत्या.
लॉकडाऊनमध्ये पोलिसांची दिवस-रात्र गस्त दिसून येत होती; परंतु अनलॉक आणि सध्या उठविलेल्या निर्बंधांमुळे पोलिसांची गस्त कमी झाली का? अशी शंका एकूणच गुन्ह्यांचा वाढत्या आलेखावरून उपस्थित झाली आहे. दिवसाढवळ्या चोरटे उघड्या दरवाज्यावाटे घरात घुसून मुद्देमाल लुटत आहेत. तर मध्यरात्री बंद घरे आणि दुकाने लक्ष्य केली जात आहेत. वाहनचोरीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे रहिवासी, व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
----------------------------------------
घरातून दागिने चोरीला
नरेंद्र शाह यांच्या कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोडवरील कृष्णा पॅराडाईज येथे असलेल्या घरातून दोन लाख ३२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना २० जुलैला दिवसा घडली आहे. शाह यांनी दागिने बेडरूममधील कपाटात ठेवले होते. या चोरीचा संशय शाह यांनी त्यांच्याकडे रंगकाम करणाऱ्या घनश्याम सिंग यांच्यावर घेतला आहे.
-----------------
अवघ्या तासाभरात चोरी
डोंबिवलीतील भोपर परिसरातील जनाबाई निवास चाळीत राहणारे नीलेश सावकार यांच्या बाथरूमच्या खिडकीची काच फोडून तेथील रॉड तोडून चोरट्यांनी खिडकीवाटे घरात प्रवेश केला आणि कपाटातील एक लाख २० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना १४ ऑगस्टला सायंकाळी ७.१५ ते ८.१५ च्या दरम्यान घडली.
------------------
अजूनही गुन्ह्याचा तपास नाही
डोंबिवलीतील छेडा रोडवरील पुंडलिक स्मृती बिल्डींगमधील तळमजल्यावरील घर फोडून चोरट्यांनी घरातील चांदीचे दागिने आणि वस्तू चोरून नेल्याची घटना एप्रिलमध्ये घडली. चोरट्यांनी घराच्या खिडकीचे लोखंडी गज तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाट फोडून आतील देवाच्या चांदीच्या मूर्ती आणि दागिने, तसेच चांदीच्या वस्तू चोरून घेऊन गेले. राम नगर पोलिसांना अद्याप या गुन्ह्यातील आरोपींना यश आलेले नाही.
----------------------------------------
मुद्देमालही हस्तगत केला जातो
चोरीच्या घटना घडत असल्या तरी बहुतांश गुन्ह्यांमध्ये कसोशीने तपास करून चोरीच्या मालासह आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे चोराचा शोध लागतो त्यावेळी मुद्देमालही हस्तगत केला जातो, असे मत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
----------------------------------------