अनिकेत घमंडी, डोंबिवलीकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला ४२ जागांवर यश मिळाल्याने पक्षांतर्गत जिल्हाध्यक्ष आणि मंडल अध्यक्षांच्या निवडणुकीत भाजपात चुरस निर्माण झाली आहे. जिल्हाध्यक्ष पदाकरिता इच्छुक बरेच आहेत. मात्र आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार की जिल्हाध्यक्षपदावर समाधान मानावे लागणार हा कळीचा मुद्दा आहे.महापालिका निवडणुकीत डोंबिवलीतून भाजपाला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. एकूण ३८ जागांपैकी २१ जागांवर भाजपाला विजय मिळाला. त्यातही पूर्वेतून २० पैकी १४ जागांवर भाजपा उमेदवार निवडून आले. त्या तुलनेत कल्याण पश्चिममध्ये पक्षाने मार खाल्ला तर पूर्वेमध्ये कमळ चांगले फुलले. कल्याण ग्रामीणमध्येही पक्षाला ६ जागांवर संघर्ष समितीच्या सहाय्याने यश मिळाले.या पार्श्वभूमीवर होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकीत पक्षाची स्थिती सुधारण्याकरिता कोण किती योगदान दिले त्याचा विचार केला जाईल. डोंबिवलीत पक्ष भक्कम करण्यासाठी पूर्वेकडील मंडल अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी वॉर्डांमध्ये संघटनेला बळकटी दिली. परिणामी खंबाळपाडा, पेंडसेनगर, चोळेगाव, सारस्वत कॉलनी, टिळक नगर आदी ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले. विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांच्या विजयात पूर्वेकडील संघटनेचा सिंहाचा वाटा होता. त्यापूर्वीच्या लोकसभेतही तेच चित्र दिसले होते.डोंबिवली पश्चिमेला भाजपला फारसे यश मिळवता आलेले नसले तरीही आमदार चव्हाण यांनी भाजपमध्ये आणलेल्या विकास म्हात्रे दाम्पत्यासह वृषाली रणजित जोशी यांनी बाजी मारली. तसेच धात्रक दाम्पत्यानेही यश मिळवले. पश्चिमेलाही ६ जागांवर यश मिळाले. तेथे सध्या प्रज्ञेश प्रभूघाटे हे पक्षाचे मंडल अध्यक्ष आहेत. कल्याण पूर्वेमध्ये भाजपा नगण्य होती, मात्र यंदा तेथे आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्यांमुळे भाजपला साधारणपणे १० जागांवर यश मिळाले. तर कल्याण पश्चिमेत मात्र आमदार नरेंद्र पवारांचा फॉर्म्युला फोल ठरला. कल्याण ग्रामीणमध्ये मात्र पक्षाला न भूतो असे यश मिळाल्याने तेथेही कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या प्रत्येक ठिकाणी मंडल स्तरावर वर्णी लागण्यासाठी पक्षातील सध्याचे मंडल स्तरावरील सचिव, चिटणीस यांनी कंबर कसली आहे. डोंबिवली पूर्वेत संजीव बिडवाडकर, रवी सिंग अशी नावे पुढे येत असून पश्चिमेला रजपूत महेंद्र हे इच्छुक आहेत तर कल्याणमध्ये पश्चिममध्ये अर्जुन म्हात्रे आणि पूर्वेला सुभाष म्हस्के हे मंडल अध्यक्ष आहेत.कांबळे-आव्हाड हे जिल्हाध्यक्षपदाकरिता इच्छुक असले तरी आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद मिळणार किंवा कसे यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. चव्हाण यांच्या गळ््यात मंत्रीपदाची माळ पडली नाही तर तेच जिल्हाध्यक्ष होतील ही काळ््या दगडावरील पांढरी रेष आहे. आमदार नरेंद्र पवार यांना पक्षाने आधीच प्रदेश सचिवपद दिले असल्याने जिल्हाध्यक्षपदाकरिता चव्हाण यांच्या स्पर्धेत तेही नाहीत. शिवाय चव्हाण जिल्हाध्यक्ष झाल्यास या पदाकरिता असलेली स्पर्धा व चुरस आपोआप संपुष्टात येते.
कल्याण-डोंबिवलीत भाजपमध्ये रस्सीखेच!
By admin | Published: December 08, 2015 12:46 AM