कल्याण- कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे नवे रुग्ण दररोज आढळून येत आहे. नवे रुग्ण कमी होत नाहीत. त्यामुळे कोरोना बाधितांचा महापालिका हद्दीतील कालर्पयतचा आकडा 43 होता. ही बाब चिंताजनक आहे. कल्याण डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट होत आहे. कोरोनाची लागण रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लक्ष्य द्यावे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात पाटील यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना ट्विट केले आहे.
महापालिका हद्दीत सुरुवातील केवळ कोरोनाचे संशयीत रुग्ण होते. लॉकडाऊन व संचारबंदीनंतरही कोरोनाच्या रुग्णात वाढ होत गेली आहे. 43 रुग्णांचा आकडा हा धक्कादायक आहे. कोरोना बाधितांच्या रुग्णात वाढ होत असताना आठवडाभरापूर्वीच महापालिका हद्दीत कोरोनाची टेस्टींग लॅबची सुविधा खाजगी लॅबमार्फत उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी राज्य सरकारकडे आमदार पाटील यांनी केली होती. मात्र त्याची पूर्तता अद्याप सरकारकडून झालेली नाही. तसेच रॅपिड टेस्ट सुरु करण्याचे सरकारने जाहिर केले होते. त्याची सुरुवात कल्याण डोंबिवलीत दिसून येत नाही.
महापालिकेने शास्त्रीनगर रुग्णालय आयसोलेशन रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. त्याठिकाणी आरोग्याच्या सुविधा नाही. पुरेसा स्टाफ नाही. पुरेशा खाटा नाहीत. त्याठिकाणी होम क्वॉरंटाइन केले जात आहे. सुविधा नसल्याने रुग्ण बरा होण्याऐवजी आजारी पडण्याची जास्त शक्यता आहे असे पाटील यांचे म्हणणो आहे. एखाद्या रुग्णाला कोरोनाचा आजार झाला आहे. हे लक्ष्यात येताच त्या परिसरातील संशयति, त्याच्या संपर्कात आलेले लोक त्याचबरोब त्याच्या घरातील मंडळी यांचा ट्रॅकिंग रेकार्ड ठेवला गेला पाहिजे. मात्र महापालिकेकडे पुरेसा स्टाफ नाही. महापालिकेने सगळी यंत्रणा आरोग्य विभागाच्या कामासाठी लावली आहे.
विविध आदेश काढले आहेत. तरी देखील त्यांचे काम पुरेसे नाही. आमदार निधीतून 50 लाखाचा निधी जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर यांना यापूर्वीच वर्ग केला आहे. निधी देऊन देखील कोरोनाची उपाययोजना करण्यासाठी त्याचा उपयोग होतानाचे चित्र प्रत्यक्षात दिसून येत नाही याविषयी पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे. मुंबईतील वरळी व धारावीत कोरोनाचा शिरकाव होताच त्याठिकाणी ज्या पद्धतीने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. ज्या प्रकारे उपाययोजना केली आहे. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवलीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष भेट धेऊन पाहणी करावी. आरोग्याच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन तातडीने आणखीन काय उपाययोजना कराव्यालागतील याचे आदेश द्यावेत अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. ही बाब त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे व आरोग्यमंत्री टोपे यांच्या निदर्शनास आणून देण्याकरीता ट्विट केले आहे.