डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यानं रस्त्यावर, बंगले, सोसायटीचा आवारात पाणी घुसलं आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. उस्मा पेट्रोल पंप ते कल्याण शीळ रोड, सुयोग हॉटेलपर्यंत गुडघाभर पाणी आहे. तेथील बंगल्यांचा आवारात पाणी शिरल्याने तेथील रहिवाशी घाबरले असून, त्यांना 26 जुलै 2005ची आठवण झाली. यावेळी फक्त दुचाकी वाहने व बगीचा, झाडांचे काही प्रमाणात नुकसान झाले.येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांची सफाई नीट न झाल्याने ते तुडुंब भरून वाहत होते. तसेच त्यापलीकडे मोकळ्या जागेत मार्बल कारखाने यांनी भराव टाकल्याने येथे पाणी साचले. एमआयडीसीतील एम्स हॉस्पिटल, ग्रीन्स स्कूल, वंदेमातरम उद्यान, मिलापनगर तलाव रोड इत्यादी बऱ्याच ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. वीजपुरवठा एक सारखा जात असल्याने तसेच स्ट्रीट लाईट काही भागात बंद असल्याने नागरिकांचा गैरसोयीत आणखी भर पडली होती.मुसळधार पावसानेकल्याणच्या सखल भागात पाणी साचलं. कल्याण एपीएमसी मार्केट, शिवाजी महाराज चौक, जोशी बाग, मोहम्मद अली चौक, जरीमरी आदी परिसरात पाणी भरले आहे. तर काही ठिकाणी दुकानात पाणी गेल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी रात्रीपासून कल्याण आणि परिसराला पावसाने झोडपले आहे.
Mumbai Rains: कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस, दोन्ही स्थानकांतील रुळ पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 09:04 IST