कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या सामान्य नागरिकांच्या समस्येला काही दिवसांपूर्वी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी वाचा फोडली होती. त्यानंतर, आता सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनीही रस्त्यांच्या दुर्दशेवर रविवारी फेसबुकवर टीका केली. केवळ कल्याणातील खड्ड्यांमुळे प्रवासात अधिक वेळ गेल्याची खंत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगासाठी शनिवारी प्रशांत दामले आले होते. त्यावेळी त्यांनी येथील खड्ड्यांचा अनुभव घेतल्यानंतर रविवारी फेसबुकवरून टीका केली. कल्याणातील नाट्यरसिक उत्तम आहेत, पण रस्ते थर्डक्लास असल्याची पोस्ट त्यांनी फेसबुकवर टाकताच ती व्हायरल झाली. इतक ी वर्षे मी रंगभूमीवर काम करीत आहे. रस्त्यांवर खड्डे का पडतात, हा संशोधनाचा विषय आहे. स्वातंत्र्योत्तर काळात दादरच्या टिळक पुलावर टाकलेले डांबर गेली ७५ वर्षे तसेच आहेत. त्यावर खड्डे पडले नाहीत. म्हणजे, आपण उत्तम रस्ते बनवू शकतो. काही ठिकाणी उत्तम रस्ते आहेतही, पण कल्याणमध्ये उत्तम रस्ते नाहीत. याचा अभ्यास करायला हवा. याचा अर्थ इच्छाशक्तीचा अभाव, हे एकमेव कारण असल्याचे दिसत आहे. त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. कल्याणनाका ते अत्रे नाट्यगृह येथे येण्यासाठी नेहमी अर्धा तास लागतो. त्याऐवजी रविवारी एक तास लागला. हा वेळ खड्ड्यांमुळे लागला. मनुष्याचा वेळ, इंधन सगळेच वाया जाते. आम्हाला प्रयोगाला उशीर झाला नाही. कारण, तसा वेळ हातात ठेवूनच आम्ही निघत असतो. परंतु, काल लागलेला वेळ म्हणजे कहरच होता, असे दामले यांनी सांगितले.
‘कल्याण-डोंबिवलीतील रसिक उत्तम, पण रस्ते थर्ड क्लास!’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 5:44 AM